
कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना भाजपमध्ये राजकीय वाक्युद्ध पेटले
डोंबिवली दि.3 डिसेंबर :
पक्ष फोडाफोडीवरून शिवसेनेने पत्रकार परिषदेमध्ये भाजपवर केलेल्या टीकेला भाजपकडूनही तितकेच जोरदारपणे प्रत्युत्तर देण्यात आले आहे. फोडाफोडीची सुरुवात आम्ही केली नसून तुम्ही एक घ्याल तर आम्ही चार घेऊ, ही शांत बसणारी भाजपा नाहीये अशा शब्दांत भाजपकडून शिवसेनेवर पलटवार करण्यात आला आहे. (“We Didn’t Start It, But This Is Not a Silent BJP”; BJP Hits Back at Shiv Sena Over Leader Inductions)
महायुतीतील एकमेकांचे पक्ष फोडण्याच्या राजकारणाने पुन्हा एकदा कल्याण डोंबिवलीतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज सकाळी भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर शिवसेनेचे आमदार राजेश मोरे आणि उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. मात्र या पत्रकार परिषदेला काही तासही उलटत नाहीत तोच भाजपकडूनही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शिवसेनेवर निशाणा साधण्यात आला.
फोडाफोडीची सुरुवात आम्ही केली नाही…
भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी पत्रकार परिषदेत संपूर्ण तारखेनिशी पक्ष प्रवेशाच्या घडामोडींची माहिती देत सुरुवात आम्ही नाही तर त्यांनीच केल्याचे यावेळी सांगितले. तसेच युती धर्म आणि तो पाळण्याची जबाबदारी केवळ आमचीच आहे का? आतापर्यंत आम्ही त्याचे पालन करत आलो होतो मात्र आधी उल्हासनगर आणि नंतर मग अंबरनाथमध्ये आमच्या पक्षाचे पदाधिकारी आपल्या पक्षात घेऊन त्यांनीच त्याचे उल्लंघन केल्याचेही परब यांनी स्पष्ट केले. त्यावर मग आम्ही खासदार साहेबांचा निषेध करायचा का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
तर भाजप हा शिस्तबद्ध पक्ष असून आम्ही पहिली चूक, दुसरीही चूक माफ केली. मात्र तिसऱ्या चुकीला माफी नाही असा इशारा वजा सल्ला देत आम्ही मैत्रीत पहिला घाव करत नाही, पण आता हातावर हात ठेवून शांत बसणारी भाजप राहिलेली नाही. तुम्ही दगड मारला तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ अशा शब्दांत भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी एकप्रकारे शिवसेनेला इशारा दिला.
यापुढील पक्षप्रवेश प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना विचारून होणार…
दरम्यान आजच्या पक्ष प्रवेशानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आपल्याला फोन करत आजच्या प्रवेशाबाबत विचारणा केल्याचे सांगत यापुढील पक्षप्रवेश आपल्याला विचारूनच करण्याचे निर्देशही दिल्याचे नंदू परब यांनी सांगितले.

























