Home ठळक बातम्या जलवाहिनीसाठी खणलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्याने अपघाताची भिती; तर येत्या मंगळवारी दुरुस्ती होणार...

जलवाहिनीसाठी खणलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्याने अपघाताची भिती; तर येत्या मंगळवारी दुरुस्ती होणार असल्याची केडीएमसीची माहिती

 

कल्याण दि. 20 जून :
कल्याण पश्चिमेला पाणीपुरवठा करणारी रस्त्याखालील मुख्य जलवाहिनी फुटल्याने सगळीकडे पाणीबाणी निर्माण झाली होती. मात्र या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी खणून ठेवलेल्या खड्ड्यामध्ये आता पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे याठिकाणी अपघाताची भिती वर्तवण्यात येत असून केडीएमसी प्रशासनाने त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
तर या दुरुस्तीसाठी आवश्यक असणारा पाईप मंगळवारपर्यंत उपलब्ध होणार असल्याने त्याचदिवशी लगेच दुरुस्ती करून हा खड्डा भरण्यात येणार असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे. (There is a fear of an accident due to water accumulating in the pit dug for the water channel; KDMC informs that repairs will be done on Tuesday)

काही दिवसांपूर्वी कल्याण पश्चिमेला पाणीपुरवठा करणारी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जुनी मुख्य जलवाहिनी फुटली होती. कल्याण पश्चिमेतील मोहम्मद अली चौकाच्यापुढे एसीपी ऑफिसकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याखाली ही जलवाहिनी फुटली होती. त्यामुळे केडीएमसी प्रशासनाने या सिमेंट काँक्रीटचा रस्ता सुमारे ८ ते १० फुटापर्यंत खणून या जलवाहिनी दुरुस्तीचे काम केले होते. तब्बल दोन दिवस या जलवाहिनीची दुरुस्ती सुरू होती.

मात्र आता या दुरुस्तीला आता जवळपास एक आठवड्याहून अधिक काळ उलटूनही केडीएमसीकडून खणण्यात आलेला हा खड्डा काही भरण्यात आला नाही. उलटपक्षी काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे त्याच्या पाण्याने हा खड्डा आता तुडुंब भरला आहे. विशेष म्हणजे हा कल्याण पश्चिमेतील मुख्य रस्त्यापैकी एक महत्त्वाचा रस्ता असूनही इतका मोठा खड्डा उघडा ठेवण्याची गरज काय आहे? या खड्ड्यामुळे एखादा अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण ? असे विविध प्रश्न त्यामुळे निर्माण झाले आहेत. तर स्थानिक नागरिकांनी मात्र कोणताही अपघात होण्यापूर्वी केडीएमसी प्रशासनाने हा खड्डा तातडीने भरण्याची मागणी केली आहे.

म्हणून येत्या मंगळवारी तातडीने केली जाणार दुरुस्ती – शहर अभियंता अनिता परदेशी 
दरम्यान यासंदर्भात केडीएमसी शहर अभियंता अनिता परदेशी यांच्याशी संपर्क साधला असता येत्या मंगळवारी याठिकाणी जलवाहिनीची उर्वरित दुरुस्ती करून लगेचच हा खड्डा भरण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच ही जलवाहिनी सुमारे 30- 35 वर्षे जुनी असून सध्या बाजारात हा पाईप मिळत नाहीये. त्यामूळे याठिकाणी क्लँपिंगद्वारे तात्पुरत्या स्वरूपात गळती थांबवण्यात आली आहे. तर या पाईपचा जॉइंट बनवण्याचे काम सध्या पुण्यामध्ये सुरू असून मंगळवारी तो मिळणार आहे. त्यामुळे तातडीने ही दुरुस्ती करून लगेचच हा खड्डा भरला जाईल आणि रस्ता पूर्ववत केला जाईल अशी माहिती शहर अभियंता अनिता परदेशी यांनी दिली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा