Home ठळक बातम्या कल्याण परिमंडळाची वीजबिल थकबाकी पोहोचली तब्बल 344 कोटींवर; अवघ्या 2 महिन्यात 210...

कल्याण परिमंडळाची वीजबिल थकबाकी पोहोचली तब्बल 344 कोटींवर; अवघ्या 2 महिन्यात 210 कोटींची भर

चालू बिलासह थकबाकी भरण्याचे महावितरणचे कळकळीचे आवाहन

कल्याण दि. 25 जून :
महावितरणच्या कल्याण परिमंडळाची वीजबिल थकबाकी तब्बल 344 कोटींवर पोहोचली आहे. ज्यामध्ये अवघ्या 2 महिन्यात 210 कोटींची भर पडली असल्याने इतकी मोठी रक्कम वसूल करण्याचे डोंगराएवढे आव्हान महावितरणपुढे निर्माण झाले आहे. (Kalyan parimandal’s electricity bill arrears reach Rs 344 crore; Rs 210 crore added in just 2 months)

विशेष म्हणजे महावितरणच्या कल्याण परिमंडलात एप्रिल आणि मे या दोन महिन्यात लघुदाब वीज ग्राहकांकडील (कृषिपंप – कायमस्वरुपी वीज खंडित ग्राहक वगळून) वीजबिल थकबाकीत तब्बल २१० कोटी रुपयांची भर पडली आहे. याव्यतिरिक्त मार्च २०२५ अखेरची २५ कोटी २३ लाख रुपयांची थकबाकी तसेच जून महिन्यातील १०८ कोटी ७६ लाख रुपयांची थकबाकी निर्माण झाली आहे. परिणामी थकित वीजबिलाची वसुली अथवा थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगत ही कारवाई टाळण्यासाठी थकीत, चालू वीजबिल तसेच सुरक्षा ठेवीचा त्वरित भरणा करण्याचे आवाहन कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी केले आहे.

या थकबाकीचा विभागनिहाय आढावा घेतल्यास कल्याण पूर्व आणि पाश्चिम तसेच डोंबिवली विभागाचा समावेश असलेल्या कल्याण मंडल कार्यालय एकअंतर्गत ६० कोटी २६ लाख रुपयांचा समावेश आहे. तर उल्हासनगरमधील एक – दोन, कल्याण ग्रामीण आणि बदलापूर विभागाचा समावेश असलेल्या कल्याण मंडल दोनअंतर्गत तब्बल १०६ कोटी ३५ लाख रुपयांचा समावेश आहे. त्याशिवाय वसई – विरार विभागाचा समावेश असलेल्या वसई मंडलात १२३ कोटी ४३ लाख तर पालघर मंडलात ५३ कोटी ९३ लाख रुपयांचा समावेश आहे. थकबाकीची इतकी मोठी रक्कम पाहता त्याच्या वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहिमही तीव्र करण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

दरम्यान जून अखेरपर्यंत रविवार आणि इतर सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय महावितरणचे www.mahadiscom.in हे संकेतस्थळ, ग्राहकांसाठीचे मोबाईल ॲप, विविध पेमेंट वॅलेट आदींच्या माध्यमातून डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग मार्फत वीजबिल ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधांचा उपयोग करून थकबाकी, चालू वीजबिल तसेच सुरक्षा ठेवीचा विहित मुदतीत भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी कल्याण परिमंडलातील वीज ग्राहकांना केले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा