
कल्याण दि.17 मार्च :
गुढीपाडव्यानिमित्त निघणाऱ्या मराठी नववर्षाचे स्वागत जल्लोषात आणि पारंपरिक पद्धतीने करण्यासाठी कल्याण नगरी सज्ज झाली आहे. येत्या चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढी पाडवा म्हणजेच १९ मार्च २०२६ रोजी आयोजित नववर्ष स्वागतयात्रेचे यंदाचे मुख्य आकर्षण ‘अनेकता में एकता’ (विविधतेत एकता) ही संकल्पना असणार आहे. (Kalyan to Host New Year Welcome Procession Based on ‘Unity in Diversity’ Theme; Jain Charitable Trust to Lead the event)
तर यंदा नववर्ष स्वागतयात्रेच्या आयोजनाचा मान कल्याणच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान असलेल्या जैन समाजाला मिळाला आहे. जैन समाजाच्या जैन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या स्वागतयात्रेचे संयोजन करण्यात आले आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातील विविध संस्कृतींचे दर्शन घडवणारी ही स्वागतयात्रा कल्याणकरांसाठी एक अविस्मरणीय सोहळा ठरणार आहे.
संस्कृतीचा संगम आणि एकात्मतेचा संदेश
भारतातील विविध राज्ये, तिथल्या भाषा, पेहराव आणि लोककला ही आपली खरी श्रीमंती आहे. हीच श्रीमंती एका सूत्रात गुंफण्यासाठी यंदा स्वागतयात्रेत ‘अनेकता में एकता’ ही थीम निवडण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या लेझीम आणि ढोल-ताशा पथकांसोबतच इतर राज्यांतील पारंपरिक लोकनृत्ये आणि चित्ररथांचा समावेश असेल. समाजातील सर्व जाती-धर्माच्या नागरिकांनी एकत्र येऊन हिंदू नववर्षाचे स्वागत करावे आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश द्यावा, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
स्वागतयात्रेचे स्वरूप आणि मार्ग
१९ मार्च रोजी सकाळी सूर्योदयाच्या सुमारास पारंपरिक पूजा आणि गुढीपूजनाने यात्रेला सुरुवात होईल. आकर्षक रांगोळ्या, फुलांची सजावट आणि भगवे ध्वज यांनी संपूर्ण कल्याण शहर न्हाऊन निघणार आहे. यात्रेत लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वजण पारंपरिक वेशभूषेत सहभागी होतील.
विविध उपक्रमांची रेलचेल
स्वागतयात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी स्वागत मंच उभारले जाणार असून, तिथे विविध प्रांतांतील संस्कृतीचे दर्शन घडवणारे कलाविष्कार सादर केले जातील. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘जय श्रीराम’च्या जयघोषात ही यात्रा शहराच्या मुख्य भागातून मार्गक्रमण करेल.
कल्याणकरांना आवाहन..,
“आपली संस्कृती, आपला अभिमान” हा विचार जपत जास्तीत जास्त नागरिकांनी सहकुटुंब या सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या निमित्ताने केवळ नववर्षाचे स्वागतच नाही, तर आपल्या देशातील विविधतेचा उत्सव आपण एकत्र साजरा करूया, असेही समितीने म्हटले आहे. या सोहळ्यास कल्याण डोंबिवलीच्या महापौर ॲड. हर्षाली थविल- चौधरी, आयुक्त अभिनव गोयल यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
कल्याण संस्कृती मंचचे अध्यक्ष डॉ. सुश्रुत वैद्य, सचिव अमोल जोशी, कोषाध्यक्ष दीपक चौधरी, सदस्य अॅड. निखिल बुधकर यांनी कल्याण संस्कृती मंच तसेच जैन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष जयंतीलाल कोठारी, सचिव धरणेन्द्र मेहता, नववर्ष स्वागतयात्रा समिति अध्यक्ष मदन शंकळेशा, तसेच आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका तर्फे सर्व नागरिकांना आग्रहाचे आमंत्रण दिले आहे.
दिनांक: गुरुवार, १९ मार्च २०२६
वेळ: सकाळी ठीक ६:०० वाजता
प्रारंभ स्थान: कमिशनर बंगला, सिंडीकेट, कल्याण.


























