
केडीएमसीच्या 650 हून अधिक कर्मचाऱ्यांचा सहभाग
कल्याण डोंबिवली दि.25 एप्रिल :
“निरोगी शरीर आणि शांत मन हीच खरी संपत्ती” या विचाराला केंद्रस्थानी ठेवत कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) च्या घनकचरा विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या सफाई कर्मचाऱ्यांसाठीच्या विशेष ध्यान-प्राणायाम कार्यशाळेचा आज यशस्वी समारोप झाला. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून आणि आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या शासकीय कार्यक्रम विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला होता. (KDMC’s Noble Initiative Receives Overwhelming Response; ‘Art of Living’ Workshop for Sanitation Workers a Big Success)
शहराची स्वच्छता राखण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे काम शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक असते. या पार्श्वभूमीवर तणावमुक्ती, मानसिक स्थैर्य आणि कार्यक्षमता वाढविणे या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
650 सफाई कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्तपणे सहभाग…
या उपक्रमांतर्गत सुमारे 1500 कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. प्रत्येक बॅचमध्ये 100 ते 300 कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता, तर प्रत्येक कार्यशाळेचा कालावधी 4 ते 5 दिवसांचा होता. पहिली कार्यशाळा 16 ते 19 एप्रिल दरम्यान अत्रे कॉन्फरन्स हॉल येथे पार पडली, ज्यामध्ये सुमारे 100 कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. त्यानंतर 20 एप्रिलपासून सुरू झालेल्या दुसऱ्या टप्प्यात सुमारे 287 कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. तर या संपूर्ण उपक्रमामध्ये आतापर्यंत केडीएमसीच्या तब्बल 650 सफाई कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून तणावमुक्त जीवन जगू शकतो – आयुक्त अभिनव गोयल…
आजच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात तणाव आहे. त्यामुळे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या विविध क्रियांच्या माध्यमातून आपण सर्व जण तणावमुक्त जीवन जगू शकतो असे मत यावेळी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी व्यक्त केले. तसेच आपण आपले मन स्वच्छ करूया आणि त्यासोबतच आपण आपले शहरही स्वच्छ करूया असे आवाहन त्यांनी उपस्थित सफाई कर्मचाऱ्यांना केले.
सफाई कर्मचाऱ्यांपासून लोकप्रतिनिधींपर्यंत प्रत्येकाने आपले आरोग्य चांगले ठेवावे – उपमहापौर राहुल दामले…
आपल्या शहराचा मूळ गाभा हा सफाई कर्मचारी असून शहर स्वच्छ राहणार की अस्वच्छ याचे कर्ता करविता तुम्ही असल्याचे सांगत उपमहापौर राहुल दामले यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेणाऱ्या आयुक्त अभिनव गोयल यांचे अभिनंदन केले. तसेच सफाई कर्मचाऱ्यांपासून लोकप्रतिनिधींपर्यंत ज्याने त्याने आपले आरोग्य चांगले ठेवणे आज काळाची गरज बनली असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यांच्या जीवनात आनंद फुलवण्याचा हा प्रयत्न – उपआयुक्त रामदास कोकरे…
या उपक्रमामुळे प्रशासनाचा कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबतचा संवेदनशील दृष्टिकोन अधोरेखित झाला असून शहराची स्वच्छता करणाऱ्या आमच्या कर्मचाऱ्यांच्या मनाची स्वच्छता करून त्यांच्या जीवनात आनंद फुलवण्याचा हा प्रयत्न असल्याचे मत घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी व्यक्त केले.
योग क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन…
कार्यशाळेदरम्यान आर्ट ऑफ लिव्हिंगच्या तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून कर्मचाऱ्यांना विविध प्राणायाम तंत्र, ध्यानधारणा आणि तणाव व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यात सकारात्मक बदल जाणवल्याचे मत अनेक सहभागी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचा समारोप आज उपमहापौर राहुल दामले, आयुक्त अभिनव गोयल, उपायुक्त रामदास कोकरे, शासकीय कार्यक्रमाच्या शीतल गायकवाड, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक ज्येष्ठ अरुण शेनॉय तसेच कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या उपक्रमाचे सफाई कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात आले असून, त्यांच्या आरोग्य आणि कल्याणासाठी महापालिकेने उचललेले हे पाऊल निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.


























