
नगरसेवक अमित धाकस यांच्या पाठपुराव्यानंतर महापालिकेकडून तातडीने कार्यवाही
कल्याण | ७ ऑक्टोबर:
कल्याणमधील पॅनेल क्रमांक ८, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड येथील पाथरे नर्सरीसमोरील सनराईज गॅलेक्सी को. ऑप. हौ. सोसायटीच्या ‘बी’ विंगमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून निर्माण झालेला गंभीर पाणीप्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ड्रेनेजचे दूषित पाणी बोअरवेलमध्ये मिसळत असल्याने सोसायटीतील रहिवाशांना मोठ्या आरोग्यविषयक समस्येला सामोरे जावे लागत होते. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत भाजप नगरसेवक अमित धाकस यांच्या पाठपुराव्यानंतर महापालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत संबंधित प्रश्न निकाली काढला.
सनराईज गॅलेक्सी सोसायटीतील बोअरवेलमध्ये ड्रेनेजचे दूषित पाणी येत असल्याने सोसायटीतील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत सोसायटीच्या अध्यक्ष तृप्ती अजय गायकवाड यांनी सोसायटीतील बहुसंख्य सदस्यांच्या वतीने संबंधित प्रश्नाची तातडीने दखल घेऊन तो सोडविण्याची विनंती केली.
यानंतर निलेश रुद्राक्ष यांच्याशी चर्चा करून तसेच नगरसेवक अमित धाकस, यांच्याशी संपर्क साधून सदर समस्येची माहिती देण्यात आली. नागरिकांच्या समस्येची गांभीर्याने दखल घेत अमित धाकस यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला. यावेळी ज्योती अशोक सोलंकी, उपाध्यक्ष, महिला मोर्चा, जुनी कल्याण शहर तसेच नितेश अहिरे यांनाही या समस्येची माहिती देण्यात आली. सोसायटीमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा अहवाल देण्याची सूचना करण्यात आली.
त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून कर्मचारी तसेच ड्रेनेजची गाडी सोसायटीमध्ये पाठविण्यात आली. ज्योती सोलंकी आणि नितेश अहिरे यांनी प्रत्यक्ष जागेवर उपस्थित राहून संबंधित काम व्यवस्थित करून घेतले. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून रखडलेला गंभीर प्रश्न अखेर मार्गी लागला.
नागरिकांकडून लोकप्रतिनिधींचे आभार…
दीर्घकाळ प्रलंबित असलेला हा प्रश्न तातडीने मार्गी लावल्याबद्दल सोसायटीतील नागरिकांनी नगरसेवक अमित धाकस यांचे आभार व्यक्त केले. नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांकडे तातडीने लक्ष देऊन प्रशासनाच्या माध्यमातून त्यावर कार्यवाही करण्यात आल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.
सोसायटीच्या वतीने शाम आडके, ज्योती अशोक सोलंकी, संगिता म्हात्रे, सुरेश चंदने, मकतार शेख, शाहीद शेख, जावेद शेख, केतन मेहता, चेतना भोईर, नागनाथ लोलेवार, निलेश रुद्राक्ष, दानिश मेमन, निर्मला घावरी, रईस खान, मुस्तफा सय्यद, विजय चावडा आणि तृप्ती गायकवाड आदींनी या कार्यवाहीबद्दल समाधान व्यक्त केले. दूषित पाणी आणि ड्रेनेजसारख्या थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. या प्रकरणात नागरिकांच्या पाठपुराव्याला प्रशासनाच्या तातडीच्या कार्यवाहीची जोड मिळाल्याने दोन महिन्यांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लागला आहे.

























