
डोंबिवली | ३ मे :
पोलीस दलातील तब्बल २१ वर्षांच्या निष्कलंक, कर्तव्यदक्ष आणि उल्लेखनीय सेवेला मान्यता देत मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत ढोले यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला. (Honouring Dedicated Service: Police Inspector Hemant Dhole Awarded Director General of Police Medal)
सन्मानचिन्हासाठी अत्यंत कठोर निकष…
महाराष्ट्र पोलीस दलातील हा सन्मान अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. या सन्मानासाठीचे निकष अत्यंत कठोर आणि आव्हानात्मक आहेत. किमान १५ वर्षांची निर्दोष सेवा, कोणतीही शिस्तभंगाची कारवाई नसणे, १०० पेक्षा अधिक गुन्ह्यांच्या उकलप्रकरणी बक्षिसे, तसेच मागील १० वर्षांतील सातत्यपूर्ण A किंवा A+ श्रेणीचे सेवा मूल्यांकन — या सर्व निकषांची पूर्तता आवश्यक असते.
पोलीस अधिकारी हेमंत ढोले यांची भरीव कामगिरी…
या सर्व निकषांमध्ये हेमंत ढोले यांनी केवळ पात्रता मिळवली नाही, तर त्याहीपेक्षा अधिक भरीव कामगिरी केली आहे. खून, खुनाचे प्रयत्न, सोनसाखळी चोरी, वाहन चोरी, खंडणी, पोलिसांवर हल्ले, तसेच अंमली पदार्थांच्या तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना अटक करून त्यांनी आपली धडाडी सिद्ध केली आहे. त्यांच्या नावावर १५० हून अधिक बक्षिसांची नोंद आहे.
२१ वर्षांच्या कार्यकाळात याठिकाणी केलंय काम…
आपल्या सेवाकाळात त्यांनी महात्मा फुले पोलीस स्टेशन, खडकपाडा, कल्याण DCP स्कॉड, ठाणे खंडणी विरोधी पथक, पुणे नार्कोटिक्स ब्रांच, CID, कोळसेवाडी आणि सध्या मानपाडा पोलीस ठाणे अशा विविध महत्त्वाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी त्यांनी प्रामाणिकपणा, धैर्य आणि कर्तव्यनिष्ठेची छाप उमटवली आहे.

यापुढेही अधिक निष्ठेने आणि जबाबदारीने सेवा देणार…
या सन्मानाबद्दल भावना व्यक्त करताना ढोले म्हणाले, “या प्रवासात अनेक आव्हाने आणि चढ-उतार आले. मात्र कुटुंबाचा आधार, वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि सहकाऱ्यांचे सहकार्य यामुळे प्रत्येक संकटावर मात करता आली. हा सन्मान केवळ माझा नसून माझ्या कुटुंबाचा, सहकाऱ्यांचा आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचा आहे. यापुढेही समाजसेवेच्या कार्यात अधिक निष्ठेने आणि जबाबदारीने योगदान देत राहीन” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

























