
तीन दिवसीय उपक्रमात ४,७०४ पुस्तकांचे वाटप
कल्याण | ४ मे :
समाज माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे पुस्तक वाचनाची सवय कमी होत असल्याची चर्चा सुरू असताना, कल्याणातील एका अभिनव उपक्रमाने ही धारणा अक्षरशः खोटी ठरवली आहे. ‘वाचाल तर वाचाल’ हा संदेश प्रत्यक्षात उतरवत, पारनाका येथील श्रीराम मंदिर पुस्तक योजना समितीतर्फे आयोजित मोफत पुस्तक वितरण उपक्रमाला वाचकांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. (“Who says reading is declining?” — Massive response to free book distribution drive in Kalyan)
१ ते ३ मे या तीन दिवसांत तब्बल १,१०० वाचकांनी भेट देत ४,७०४ पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमातून एक स्पष्ट संदेश गेला—“वाचक अजूनही आहेत, फक्त त्यांना योग्य व्यासपीठाची गरज आहे!”
१ मे—महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमा—या त्रिसूत्री योग साधत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी ८ वाजता राम मंदिर, पारनाका येथे रामजी देवस्थानचे अध्यक्ष प्रकाश लेले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक राजेश देसाई यांनी केले, तर सूत्रसंचालन संदीप पळणीटकर यांनी केले.

या उपक्रमामागे प्रसाद चाफेकर, राजेश देसाई, मिलिंद रेडे, प्रकाश लेले यांसारख्या उत्साही कार्यकर्त्यांचा पुढाकार होता. केवळ आठ दिवसांत व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आवाहन करत ५,००० हून अधिक पुस्तके संकलित करण्यात आली. यात धार्मिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक, आत्मचरित्रे, कादंबऱ्या, बालसाहित्य, कवितासंग्रह, प्रवासवर्णन, पाककला, स्पर्धा परीक्षा आणि सामान्य ज्ञान अशा विविध विषयांचा समावेश होता.
कार्यक्रमासाठी जागेची अडचण असताना, प्रसाद चाफेकर यांनी मंदिराचे दरवाजे खुले करून ही समस्या सोडवली. मंदिर परिसरातच पुस्तकांचे आकर्षक मांडणी करून वाचनाचा एक उत्सवच उभा करण्यात आला.
३ दिवसांत मिळाला असा प्रतिसाद :
१ मे: ५०० वाचक, २,३०४ पुस्तके वितरीत
२ मे: ३०० वाचक, १,५०० पुस्तके वितरीत
३ मे: ३०० वाचक, १,००० पुस्तके वितरीत
मुळात हा उपक्रम फक्त एका दिवसासाठी नियोजित होता. मात्र, मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे तो आणखी दोन दिवस वाढवण्यात आला.

मराठीप्रेमी वाचकाने परदेशातूनही केली मागणी…
या उपक्रमाची बातमी ओमानपर्यंत पोहोचली. तेथील एका मराठी वाचकाने फोन करून दुर्मीळ पुस्तकांची मागणी केली, तर अलिबागमधील एका डॉक्टरांनी होमिओपॅथीवरील पुस्तकाची मागणी नोंदवली. या उपक्रमात मराठी, हिंदी आणि गुजराती भाषेतील पुस्तकांचा समावेश होता. कार्यक्रमानंतर उरलेली पुस्तके विविध संस्थांच्या वाचनालयांना मोफत देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. त्यामुळे हा केवळ उपक्रम नाही, तर वाचन संस्कृतीचा अनोखा असा उत्सव ठरल्याची प्रतिक्रिया आयोजक प्रसाद चाफेकर यांनी दिली.

























