
मिसिंग लिंक प्रकल्पातही वापरण्यात आलेय हेच तंत्रज्ञान
कल्याण | 5 मे :
स्मार्ट कल्याण-डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (SKDCL) अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या कल्याण पश्चिम स्टेशन परिसर सुधारणा प्रकल्पाने (SATIS)आता आधुनिकतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. या प्रकल्पातील सुभाषचंद्र बोस चौक ते बैलबाजार चौकादरम्यान उभारण्यात येणाऱ्या सुमारे ११२५ मीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. (SATIS Project in Kalyan: Successful Launching of UHPFRC Technology-Based Girders)
या उड्डाणपुलाच्या Span AP14-ACP1 आणि ACP1-ACP2 या भागात बांधकामासाठी ‘अल्ट्रा-हाय परफॉर्मन्स फायबर रिइन्फोर्स्ड काँक्रीट (UHPFRC)’ या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पाच्या स्ट्रक्चरल डिझाइनची पडताळणी IIT Bombay यांच्यामार्फत करण्यात आली असून, त्यामुळे प्रकल्पाच्या गुणवत्तेला भक्कम आधार मिळाला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी लोकार्पण झालेल्या मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवेवरील मिसिंग लिंक प्रकल्पातही अशाच प्रकारचे अल्ट्रा-हाय परफॉर्मन्स फायबर रिइन्फोर्स्ड काँक्रीट (UHPFRC)’ तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.
कल्याण स्टेशन परिसरातील पंडित जवाहरलाल नेहरू चौक (प्रवेशद्वार क्र. ०१) येथे असलेला विद्यमान पादचारी पूल (FOB) हटविणे अपरिहार्य होते. मात्र, प्रवाशांची मोठी वर्दळ लक्षात घेता तो पर्याय टाळून त्याऐवजी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत काल मध्यरात्री गर्डर लॉन्चिंग यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले.
यावेळी महापौर ॲड. हर्षाली थविल- चौधरी, आयुक्त अभिनव गोयल, शहर अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे तसेच प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आणि कंत्राटदार उपस्थित होते.

UHPFRC तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये…
UHPFRC हे पारंपरिक काँक्रीटपेक्षा अनेक पटीने अधिक मजबूत, लवचिक आणि टिकाऊ आहे. सिमेंट, सिलिका फ्युम, विशेष स्टील फायबर्स आणि रसायनांच्या मिश्रणातून तयार होणारे हे काँक्रीट स्टीलसारखी मजबुती प्रदान करते.
* संकुचन शक्ती पारंपरिक काँक्रीटपेक्षा ५ ते ६ पट अधिक
* अत्यंत दाट रचना, त्यामुळे हवामान व प्रदूषणाचा परिणाम कमी
* पुलाचे आयुष्य १०० वर्षांपेक्षा अधिक
* भूकंपासारख्या आपत्तींमध्ये अधिक सुरक्षित
* तडे जाण्याचे प्रमाण नगण्य, त्यामुळे देखभाल खर्चात मोठी बचत
वाहतूक कोंडीवर उपाय; पायाभूत सुविधांना चालना...
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून वापरण्यात आलेले हे अत्याधुनिक तंत्रज्ञान शहराच्या पायाभूत सुविधांना नवी दिशा देणारे ठरणार आहे. विशेषतः कल्याण पश्चिम स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हा उड्डाणपूल महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे मानले जात आहे.
कल्याणातील या सॅटीस प्रकल्पामध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पातील UHPFRC तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर करण्यात आला असून हा प्रकल्प अधिक वेगाने पूर्णत्वास घेण्यासाठी केडीएमसी प्रशासन प्रयत्नशील दिसत आहे.


























