Home ठळक बातम्या कल्याणच्या त्रिशाने पटकावला ‘Little Miss India 2026’चा मान, ‘इंडोनेशियातील आंतरराष्ट्रीय मंचावर मिळाली...

कल्याणच्या त्रिशाने पटकावला ‘Little Miss India 2026’चा मान, ‘इंडोनेशियातील आंतरराष्ट्रीय मंचावर मिळाली भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी

कल्याण | ७ ऑक्टोबर
वय अवघे सात वर्षे… पण स्वप्न मात्र आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवण्याचे! हे स्वप्न साकारण्याच्या दिशेने कल्याणची चिमुकली प्रतिभावान त्रिशा सोनावणे हिने दमदार पाऊल टाकले आहे. Global Model India – Alpha GenZ 2026 या स्पर्धेत त्रिशाने ‘GMI Little Miss India of the Year 2026’ हा किताब पटकावत कल्याणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. या यशानंतर बाली येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तिची निवड झाली आहे. (Kalyan’s Trisha Crowned ‘Little Miss India 2026’; Set to Represent India on the International Stage in Indonesia)

पुण्यातील सिम्बायोसिस ऑडिटोरियममध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत विविध ठिकाणांहून आलेल्या बालप्रतिभांनी सहभाग घेतला होता. मॉडेलिंग, व्यक्तिमत्त्व, सादरीकरण आणि आत्मविश्वास अशा विविध कसोट्यांवर झालेल्या स्पर्धेत त्रिशाने आपल्या प्रतिभेची प्रभावी छाप उमटवत राष्ट्रीय किताबावर नाव कोरले.

या स्पर्धेतून महाराष्ट्रातील त्रिशा सोनावणे आणि रेवा दिघे, तसेच ओडिशातील अनन्या मेहर या तीन बालप्रतिभांची बाली येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे.

मॉडेलिंगपासून अभिनयापर्यंत बहुआयामी वाटचाल…
त्रिशा ही Holy Cross School ची विद्यार्थिनी असून, शिक्षणासोबतच बालकलाकार आणि मॉडेल म्हणूनही आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आहे. विविध मॉडेलिंग उपक्रमांमध्ये सहभाग घेतल्यानंतर तिने अभिनय आणि जाहिरात क्षेत्रातही काम केले आहे.

विशेष म्हणजे, त्रिशाची वाटचाल केवळ मॉडेलिंग आणि अभिनयापुरती मर्यादित नाही. ती Swanand Creation येथे अभिनयाचे प्रशिक्षण घेत असून, Ravindra Vidya Kala Mandir येथे स्मिता ताई यांच्या मार्गदर्शनाखाली कथ्थकचे प्रशिक्षणही घेत आहे. त्यामुळे अभिनय, मॉडेलिंग आणि नृत्य अशा विविध कलांचा समतोल साधत तिची कलात्मक जडणघडण होत आहे.

यशामागे पालक आणि मार्गदर्शकांची साथ…
त्रिशाच्या या यशामागे तिचे आई-वडील मंगेश सोनावणे आणि राजश्री सोनावणे यांचा सातत्यपूर्ण पाठिंबा आहे. तसेच शो डायरेक्टर अमर सोनावणे यांचे मार्गदर्शनही तिच्या या प्रवासात महत्त्वाचे ठरले आहे. लहान वयात मिळालेल्या संधींचा योग्य उपयोग करत त्रिशा आत्मविश्वासाने मनोरंजन आणि मॉडेलिंगच्या क्षेत्रात पुढे जात आहे.

आता बालीच्या आंतरराष्ट्रीय मंचाची उत्सुकता…
राष्ट्रीय स्तरावरील किताबानंतर आता त्रिशाच्या पुढील प्रवासाकडे कल्याणकरांचे लक्ष लागले आहे. भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी ही तिच्यासाठी केवळ वैयक्तिक यश नसून, कल्याणच्या बालप्रतिभेला मिळालेली आंतरराष्ट्रीय झेप आहे.

अवघ्या सातव्या वर्षी राष्ट्रीय किताब पटकावून आंतरराष्ट्रीय मंचाकडे वाटचाल करणारी त्रिशा आजच्या पिढीतील मुलांच्या ‘लहान वयात मोठी स्वप्ने’ या जिद्दीचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.

कल्याणच्या या चिमुकल्या ‘Little Miss India’च्या आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आता संपूर्ण कल्याण-डोंबिवलीकरांच्या शुभेच्छा तिच्या सोबत आहेत. 🇮🇳👑🌏

माहिती आणि छायाचित्रे सौजन्य : राहुल कारभारी, एलएनएन सिटीझन रिपोर्टर

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा