Home ठळक बातम्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कल्याणात ‘दिवाळी पहाट’; आर्थिक मदतीचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कल्याणात ‘दिवाळी पहाट’; आर्थिक मदतीचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भाजप कल्याण पश्चिम, मंगेशी ग्रुप आणि कल्याण गौरवचा स्तुत्य उपक्रम; मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सामाजिक संस्था, उद्योजक आणि नागरिकांचे योगदान

कल्याण | १० नोव्हेंबर
दिवाळीचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता संकटात सापडलेल्या बळीराजाच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपण्याचा एक स्तुत्य उपक्रम कल्याणमध्ये राबविण्यात आला. भारतीय जनता पक्ष कल्याण पश्चिम, मंगेशी ग्रुप आणि कल्याण गौरव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाला कल्याणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आर्थिक योगदान देण्यात आले. (Kalyan’s ‘Diwali Pahat’ Strikes a Chord of Humanity; Citizens Extend Generous Support to Drought-Hit Farmers)

कल्याण पश्चिमेतील आद्य क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके मैदान येथे आयोजित या कार्यक्रमाला पहाटेपासूनच संगीतप्रेमी आणि नागरिकांनी मोठी उपस्थिती लावली. मात्र, या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य केवळ सांगीतिक मेजवानी नव्हते, तर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एकत्र आलेली कल्याणमधील सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील मंडळी हे या उपक्रमाचे खरे वैशिष्ट्य ठरले.

कल्याणमधील विविध सामाजिक संस्था, उद्योजक, व्यावसायिक तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला. विशेष म्हणजे, मदतीचा हा उपक्रम केवळ कार्यक्रमापुरता मर्यादित नसून, इच्छुक व्यक्तींना पुढील दोन दिवसही आयोजकांकडे धनादेशाद्वारे आपले आर्थिक योगदान देता येणार आहे.

कार्यक्रमाला सांस्कृतिक रंगत देण्यासाठी मराठी भक्तिगीते, संत तुकारामांचे अभंग आणि भावगीतांसह पुरस्कारप्राप्त मराठी चित्रपटातील गीतांची सुरेल मैफल सजली होती. सुप्रसिद्ध पार्श्वगायक ज्ञानेश्वर मेश्राम, हर्षवर्धन वावरे, पार्श्वगायिका आनंदी जोशी आणि भाग्यश्री देशपांडे यांनी आपल्या सुमधुर आवाजाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. भक्तिसंगीत आणि मराठी भावविश्वाचा सुंदर संगम अनुभवताना फडके मैदानावरील वातावरण भक्तिमय आणि आनंदमय झाले. या सुरेल सादरीकरणामुळे दिवाळी पहाट कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने एक वेगळी सांस्कृतिक उंची प्राप्त झाली. तर सुप्रसिद्ध निवेदिका दिप्ती भागवत यांच्या बहारदार सुसंवादाने कार्यक्रमात आणखी रंगत आली.

या कार्यक्रमाला आमदार किसन कथोरे, बांधकाम व्यावसायिक मंगेश गायकर, शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील, ज्येष्ठ नगरसेवक जयवंत भोईर, माजी स्थायी समिती सभापती संदीप गायकर, नगरसेवक अमित धाक्रस, नगरसेविका विजया पोटे, हेमलता पवार, नगरसेवक शामल गायकर, नगरसेविका डॉ. तनुजा वायले, नगरसेवक विशाल गारवे, टीडीसी बँक संचालक अरुण पाटील, कल्याण एपीएमसी अध्यक्ष रविंद्र घोडविंदे, महाराष्ट्र रेडिओलॉजिस्ट संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, डॉ. दीपक वझे आदी मान्यवर उपस्थित होते.

संगीताच्या सुरांतून माणुसकीचा संदेश आणि उत्सवाच्या आनंदातून शेतकऱ्यांना मदतीचा हात अशी या दिवाळी पहाट कार्यक्रमाची संकल्पना कल्याणकरांनी आपल्या उत्स्फूर्त सहभागातून यशस्वी करून दाखवली. दिवाळीच्या प्रकाशपर्वात बळीराजाच्या आयुष्यातही आशेचा नवा प्रकाश निर्माण करण्याचा हा उपक्रम सामाजिक एकतेचे आणि संवेदनशीलतेचे प्रेरणादायी उदाहरण ठरला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा