Home ठळक बातम्या कल्याण-डोंबिवलीला भरली हुडहुडी ; तापमानाचा पारा आला १४.६ अंशांवर

कल्याण-डोंबिवलीला भरली हुडहुडी ; तापमानाचा पारा आला १४.६ अंशांवर

डोंबिवलीत १५ तर कल्याणात १४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद; मुंबईतही हंगामातील नीचांकी १६.२ अंश तापमान, कोकण पट्ट्यात गारवा वाढला

कल्याण डोंबिवली | २१ नोव्हेंबर
नोव्हेंबरच्या उत्तरार्धात कल्याण-डोंबिवलीकरांना अखेर थंडीची चाहूल लागली आहे. शहरातील किमान तापमानात लक्षणीय घट झाली असून, कल्याणमध्ये पारा १४.६ अंश सेल्सिअस, तर डोंबिवलीत १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. पहाटेच्या वेळी हवेत गारवा जाणवू लागल्याने नागरिकांना थंडीचा अनुभव येत आहे. दरम्यान, मुंबईतही किमान तापमान १६.२ अंशांवर घसरले असून, चालू हंगामातील आतापर्यंतचे हे नीचांकी तापमान ठरल्याची माहिती खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी एलएनएनला दिली आहे. (Winter Chill Grips Kalyan-Dombivli as Minimum Temperature Drops to 14.6°C)

खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी २१ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, कोकण पट्ट्यातील अनेक भागांमध्ये किमान तापमानात घट झाली आहे. विशेषतः अंतर्गत भागांमध्ये तापमान ११ ते १३ अंशांच्या आसपास नोंदवण्यात आले आहे.

सुकसाळे येथे सर्वात कमी तापमान
उपलब्ध आकडेवारीनुसार सुकसाळे येथे सर्वात कमी म्हणजे ११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल शहापूर येथे १२.५, सावर्डे येथे १२.८, बदलापूर येथे १२.९, नेरळ येथे १३, पालघर येथे १३.२, कर्जत येथे १३.३ आणि भातसानगर येथे १३.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.

मुंबईच्या तापमानात ४.८ अंशांची घसरण
मुंबईत आदल्या दिवशी २१ अंश सेल्सिअस असलेले किमान तापमान २४ तासांत घसरून १६.२ अंशांवर आले. म्हणजेच एका दिवसात ४.८ अंशांची घट झाली आहे. याशिवाय महाड येथे १४.७, विरार येथे १४.८, चिपळूण येथे १४.९, पनवेल येथे १५.२, उत्तन येथे १५.५, डहाणू येथे १५.६, ठाणे येथे १५.९, नवी मुंबई येथे १६ आणि रत्नागिरी येथे १७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

नोव्हेंबरमधील हंगामी बदलाचा परिणाम
नोव्हेंबर महिना पुढे सरकत असताना कोरडी हवा, रात्रीच्या वेळी अनुकूल वातावरण आणि ईशान्येकडून वाहणारे वारे यांमुळे किमान तापमानात घट होणे ही हंगामी प्रक्रिया आहे. रात्री आकाश निरभ्र आणि वारे तुलनेने शांत असल्यास जमिनीतील उष्णता वेगाने बाहेर पडते. त्यामुळे पहाटेच्या वेळी गारवा अधिक जाणवत असल्याचे हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी सांगितले. तर हा गारठा येत्या सोमवारपासून कमी होणार असून इथल्या तापमानात पुन्हा एकदा वाढ होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा