
मंजिरी फडके, मृण्मयी भिडे आणि चेतना भट यांना ‘कल्याणकर नवदुर्गा पुरस्कार २०२६’ प्रदान; निकम यांच्या कवितांनी उपस्थितांची जिंकली मने
कल्याण | २२ नोव्हेंबर
समाजातील विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या आणि समाजासाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यासाठी श्रीराम सेवा मंडळ, कल्याण यांच्या वतीने आयोजित ‘कल्याणकर नवदुर्गा पुरस्कार २०२६’ सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी कल्याणमधील कर्तृत्ववान नवदुर्गांचा ज्येष्ठ विधिज्ञ तथा राज्यसभा खासदार ॲड. उज्ज्वल निकम, विद्यानिकेतन शाळेचे विवेक पंडित सर आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यंदाच्या पुरस्काराचे हे ३ रे वर्ष होते. (Kalyan Celebrates Women Achievers at Navdurga Awards 2026; Ujjwal Nikam’s Interview Steals the Show)
यावेळी कल्याण डोंबिवलीच्या महापौर ॲड हर्षाली थविल-चौधरी, सभागृह नेते वरुण पाटील, भाजप नगरसेवक अमित धाक्रस, मुंबई हायकोर्टाचे वरिष्ठ वकील ॲड. अनिरुद्ध गर्गे, कल्याणचे एसीपी अशोक होनमाने, के.सी. गांधी शाळेचे मनोहर पालन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाबद्दल ज्येष्ठ समाजसेविका मंजिरी फडके, गायन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी मृण्मयी भिडे आणि अभिनय क्षेत्रातील योगदानासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री चेतना भट यांना ‘कल्याणकर नवदुर्गा पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. चेतना भट या कामानिमित्त परदेशात असल्याने त्यांच्या वतीने त्यांच्या आई-वडिलांनी हा पुरस्कार स्वीकारला.
महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव आणि त्यांच्या कार्यातून समाजाला प्रेरणा देण्याच्या उद्देशाने आयोजित या सोहळ्याला उपस्थित मान्यवर आणि रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध क्षेत्रांत कार्यरत महिलांच्या योगदानाची दखल घेत त्यांना सन्मानाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा श्रीराम सेवा मंडळाचा हा उपक्रम विशेष ठरला.

ज्या समाजात महिलांचा सन्मान त्याचीच प्रगती – केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल
आपण जगाच्या इतिहासावर एक नजर टाकली तर असे दिसून येईल की ज्या समाजामध्ये कला, वाड:मय, संस्कृतीसह महिलांचाही सन्मान झाला त्याच समाजाची प्रगती होऊ शकली असे मत यावेळी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी नवदुर्गांच्या सन्मानाबद्दल व्यक्त केले. श्रीराम सेवा मंडळाने या नवदुर्गांचा सन्मान करून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केल्याची कौतुकाची थापही त्यांनी यावेळी दिली.
स्त्रियांना केवळ कागदोपत्री नाही तर प्रत्यक्षात सन्मान मिळणे आवश्यक – विवेक पंडीत सर
प्रत्येक समाजामध्ये स्त्रियांना केवळ कागदोपत्री नव्हे तर प्रत्यक्षात कौटुंबिक स्तरावरही तितकाच मान मिळणे आवश्यक असल्याची गरज विद्यानिकेतन शाळेचे प्रमुख आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष विवेक पंडीत सर यांनी अधोरेखित केली. कोणत्याही कुटुंबामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांवर अधिक जबाबदारी टाकली जाते, परंतु आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित प्रयत्न केले तर महिलांवरील ताण कमी होईल असे आवाहनही पंडीत सरांनी यावेळी केले.
ॲड. उज्ज्वल निकम यांच्या प्रवासाचा उलगडा
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर ज्येष्ठ विधिज्ञ तथा राज्यसभा खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांची सुप्रसिद्ध निवेदक श्रीराम केळकर यांनी घेतलेली विशेष प्रकट मुलाखत, या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरली. या मुलाखतीत निकम यांच्या महाविद्यालयीन जीवनापासून ते सरकारी वकील आणि राज्यसभा खासदार म्हणून आजवरच्या प्रवासाचा धावता वेध यामध्ये घेण्यात आला. त्यांच्या प्रदीर्घ कायदेविषयक कारकिर्दीतील अनुभव, महत्त्वाचे टप्पे आणि वाटचालीतील विविध पैलू यावेळी उलगडले गेले. या मुलाखतीदरम्यान ॲड. निकम यांच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एक वेगळी बाजू उपस्थितांना अनुभवायला मिळाली. कायद्याच्या क्षेत्रात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या निकम यांच्यातील प्रतिभावान कवी मनाचीही यावेळी ओळख झाली. त्यांनी आपल्या जुन्या काही खुमासदार कविता सादर करत उपस्थितांची मनमुराद दाद मिळवली. त्यामुळे मुलाखतीला एक वेगळीच रंगत आली.

तर राजकारणाविषयी बोलताना आपण स्पष्टवक्ता असल्याने राजकारणासाठी योग्य नसल्याचे मत व्यक्त करत चांगल्या लोकांनी राजकारणात पुढे यावे आणि सार्वजनिक जीवनात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही ॲड. निकम यांनी उपस्थितांना केले.
स्त्रीशक्तीचा सन्मान, विविध क्षेत्रांतील कर्तृत्वाचा गौरव आणि एका अनुभवी विधिज्ञाच्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रवासाचा वेध अशा विविध पैलूंनी श्रीराम सेवा मंडळाचा ‘कल्याणकर नवदुर्गा पुरस्कार २०२६’ सोहळा संस्मरणीय ठरला. तो यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.
सर्व छायाचित्रे सौजन्य : फोटोजर्नलिस्ट रुपेश तांबोळी…























