Home ठळक बातम्या “धावण्याच्या माध्यमातून दिव्यांगांच्या आयुष्यात नवी उमेद; कल्याणच्या रोटरी मॅरेथॉनमध्ये २,५०० हून अधिक...

“धावण्याच्या माध्यमातून दिव्यांगांच्या आयुष्यात नवी उमेद; कल्याणच्या रोटरी मॅरेथॉनमध्ये २,५०० हून अधिक धावपटूंचा सहभाग

फिटनेस गुरू सौरभ बोथ्रा, अभिनेता ललित प्रभाकर यांची उपस्थिती; केडीएमसीद्वारे सौरऊर्जा – कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती

कल्याण | २२ नोव्हेंबर
आरोग्य, फिटनेस आणि सामाजिक बांधिलकी यांचा अनोखा संगम असलेल्या ‘बोरगावकर रोटरी कल्याण मॅरेथॉन २०२६’ चे सातवे पर्व आज अत्यंत उत्साहात पार पडले. रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मॅरेथॉनमध्ये सुमारे २,००० ते २,५०० नागरिकांनी सहभाग नोंदवत धावण्याच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. (Running for a Cause: Rotary Marathon in Kalyan Sees Participation of Over 2,500 Runners, Bringing New Hope to Divyang Individuals)

या मॅरेथॉनसाठी जगविख्यात फिटनेस गुरू सौरभ बोथ्रा, प्रसिद्ध सिनेसृष्टीतील अभिनेता ललित प्रभाकर, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर ॲड. हर्षाली थविल चौधरी, महापालिका आयुक्त अभिनव गोयल, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ चे अध्यक्ष डॉ. निलेश जयवंत तसेच बोरगावकर ग्रुपचे संजय बोरगावकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.


मॅरेथॉनमध्ये ३ किमी, ५ किमी, १० किमी आणि २१ किमी अशा चार गटांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कल्याण डोंबिवलीच्या महापौर ॲड हर्षाली थविल-चौधरी, केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते या मॅरेथॉनमध्ये सहभागी धावपटूंना फ्लॅगऑफ करण्यात आले. नवोदित धावपटूंपासून अनुभवी मॅरेथॉनपटूंपर्यंत विविध वयोगटांतील नागरिकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. गेल्या सहा वर्षांपासून कल्याणकरांचा वाढता प्रतिसाद लाभत असलेल्या या मॅरेथॉनने शहराच्या क्रीडा क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे, उत्कृष्ट आयोजन आणि व्यवस्थापनासाठी या मॅरेथॉनला सलग तीन वर्षे मुंबई रोड रनर्स (MRR) रेस रेटिंगमध्ये प्रथम क्रमांकाचा मान मिळाला आहे.


धावण्याच्या माध्यमातून दिव्यांगांच्या आयुष्यात नवी उमेद!
या मॅरेथॉनचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्यामागील सामाजिक उद्देश. कृत्रिम हात आणि पायांची मोफत सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या रोटरी दिव्यांग सेंटरच्या कार्याला आर्थिक हातभार लावण्यासाठी या मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. याशिवाय, स्पर्धेतून मिळणारा निधी गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण, बालआरोग्य आणि रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणच्या विविध समाजोपयोगी प्रकल्पांसाठी वापरण्यात येतो. ज्या माध्यमातून आतापर्यंत शेकडो दिव्यांग व्यक्तींना आपल्या पायावर उभे राहण्यात मोठी मदत झाली आहे. त्यामुळे ही मॅरेथॉन केवळ पदक आणि पारितोषिकांसाठी धावण्याची स्पर्धा न राहता, गरजू आणि दिव्यांग व्यक्तींच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आयोजित केलेला सामाजिक उपक्रम ठरत आहे.


केडीएमसीकडून मॅरेथॉनमध्ये सौरऊर्जा, वीजबचत- कचरा वर्गीकरणाबागत जनजागृती…
या मॅरेथॉनचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले ते केडीएमसीच्या विद्युत आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाने जनजागृतीसाठी घेतलेला उत्स्फूर्त प्रतिसाद. केडीएमसीचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांच्यासह विद्युत विभागाच्या अधिकारी – कर्मचाऱ्यांनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन सौरऊर्जा तसेच ऊर्जा बचतीचा संदेश दिला. केडीएमसी विद्युत विभागाच्या या उपक्रमाचे कल्याण डोंबिवलीच्या महापौर ॲड हर्षाली थविल-चौधरी, आयुक्त अभिनव गोयल यांनी विशेष कौतुकही केले.

ही मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणचे अध्यक्ष रमेश गोरे, सचिव प्रफुल्ल क्षीरसागर, प्रोजेक्ट चेअरमन कैलास देशपांडे, निखिल बुधकर यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा