Home ठळक बातम्या तीन वर्षांपासून इमारत तयार, तरीही रुग्णालय सुरू होईना! गौरीपाड्यातील १०० खाटांच्या रुग्णालयाबाबत...

तीन वर्षांपासून इमारत तयार, तरीही रुग्णालय सुरू होईना! गौरीपाड्यातील १०० खाटांच्या रुग्णालयाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक

कल्याण लोकसभा संपर्क प्रमूख महेश तपासे यांनी रुग्णालयाची पाहणी करून घेतली केडीएमसी आयुक्तांची भेट

कल्याण | २६ ऑक्टोबर
कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात उभारण्यात आलेले १०० खाटांचे रुग्णालय गेल्या तीन वर्षांपासून वापराविना पडून असल्याचा मुद्दा उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांचे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी महेश तपासे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) प्रशासनाला जाब विचारला आहे. रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर त्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र देत रुग्णालयाच्या उद्घाटनाची तारीख जाहीर करून वैद्यकीय सेवा तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. (Building Ready for Three Years, Yet Hospital Remains Non-Operational! NCP (Sharadchandra Pawar Faction) Raises Concerns Over Kalyan’s 100-Bed Gauripada Hospital)

महेश तपासे यांनी २६ ऑक्टोबर २०२६ रोजी महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रानुसार, गौरीपाडा येथील १०० खाटांच्या रुग्णालयाची इमारत २०२३ मध्ये महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली होती. मात्र, तीन वर्षांहून अधिक काळ उलटूनही रुग्णालयाचे औपचारिक उद्घाटन झालेले नाही आणि प्रत्यक्ष वैद्यकीय सेवाही सुरू झालेली नसल्याने त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

रुग्णालय तयार, पण नागरिकांना उपचारांसाठी प्रतीक्षाच!
गौरीपाडा आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना आरोग्यसेवेसाठी दूरच्या सरकारी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत असल्याचा मुद्दा तपासे यांनी उपस्थित केला आहे. खासगी रुग्णालयांमधील उपचारांचा खर्च अनेकांना परवडत नसल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना याचा अधिक फटका बसत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. सार्वजनिक निधीतून उभारलेली रुग्णालयाची इमारत वापराविना पडून असताना नागरिकांना आवश्यक आरोग्यसेवा मिळत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. रुग्णालय सुरू करण्यास आणखी विलंब न करता आवश्यक कर्मचारी, वैद्यकीय उपकरणे आणि इतर सोयीसुविधांची पूर्तता करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

कोविडकाळातील ऑक्सिजन सिलिंडर उघड्यावर?…
रुग्णालयाच्या इमारतीचा सध्या कोविड-१९ काळात खरेदी करण्यात आलेले वैद्यकीय ऑक्सिजन सिलिंडर आणि संबंधित उपकरणे साठवण्यासाठी वापर होत असल्याचे तपासे यांनी पत्रात नमूद केले आहे. यातील काही सिलिंडर आणि वैद्यकीय साहित्य उघड्यावर, ऊन-पावसाच्या संपर्कात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

वैद्यकीय उपकरणांची योग्य पद्धतीने साठवणूक न झाल्यास सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता असून, सुरक्षेच्या दृष्टीनेही ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे संबंधित सिलिंडर आणि उपकरणे सुरक्षित, आच्छादित व नियमानुसार असलेल्या साठवणूक सुविधेत हलवावीत. तसेच उपलब्ध साठ्याची मोजणी करून उपकरणांचे सुरक्षा परीक्षण आणि लेखापरीक्षण करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

१ डिसेंबरपर्यंत उद्घाटनाची तारीख जाहीर करण्याची मागणी…
रुग्णालय सुरू करण्याची निश्चित तारीख जाहीर करा,
१ डिसेंबर २०२६ पर्यंत रुग्णालयाचे औपचारिक उद्घाटन करा, वैद्यकीय साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, ऑक्सिजन सिलिंडर आणि इतर उपकरणांची सुरक्षित साठवणूक करून त्यांचे सुरक्षा परीक्षण करावे, वैद्यकीय सेवा सुरू करण्याची तयारी पूर्ण करावी, आवश्यक कर्मचारी भरती, वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता आणि इतर प्रशासकीय औपचारिकता पूर्ण करून रुग्णालय लवकरात लवकर कार्यान्वित करावे, तसेच या प्रकरणी १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत केलेल्या कार्यवाहीचा तपशील आणि पुढील कामकाजाचे वेळापत्रक लेखी स्वरूपात द्यावे अशा मागण्याही तपासे यांनी केडीएमसी आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत केल्या आहेत.

तसेच यासंदर्भात प्रशासनाकडून ठोस कार्यवाही न झाल्यास नागरिकांच्या प्रश्नासाठी लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशाराही तपासे यांनी दिला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा