
ठाणे दि.२५ एप्रिल :
भारतीय जनगणनेच्या ऐतिहासिक प्रक्रियेला आता ठाणे जिल्ह्यात खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून, जिल्हा प्रशासनाने या राष्ट्रीय मोहिमेसाठी कंबर कसली आहे. केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘जनगणना २०२७’ अंतर्गत पहिल्या टप्प्यातील घरयादी आणि घरगणना कामासाठी आजपासून जिल्ह्यातील 9 चार्ज अधिकारी कार्यालयांमध्ये प्रगणक – पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. या सलग सत्रांमध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांना जनगणनेच्या संपूर्ण डिजिटल कार्यपद्धतीचे सखोल मार्गदर्शन केले जात असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ही प्रक्रिया कशी पार पाडायची, याचे धडे दिले जात आहेत. (Census 2027 Preparations Gain Momentum in Thane District; Training of Enumerators and Supervisors Begins)
ठाणे जिल्ह्यात १६ मे ते १४ जूनदरम्यान घरयादी – घर गणना मोहीम…
यावेळच्या जनगणनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचे पूर्णपणे ‘डिजिटल’ असणे. प्रशिक्षणादरम्यान प्रगणकांना विशेष मोबाईल ॲपचा वापर, क्लिष्ट वाटणाऱ्या प्रश्नावलीचे सुलभीकरण, हाउस लिस्टिंग ब्लॉकची (HLB) अचूक रचना आणि संकलित केलेल्या माहितीची गोपनीयता व सुरक्षितता यांसारख्या तांत्रिक बाबींवर विशेष भर दिला जात आहे. प्रशिक्षणाचे हे टप्पे केवळ सैद्धांतिक नसून, त्यामध्ये प्रात्यक्षिकांचाही समावेश करण्यात आला आहे, जेणेकरून प्रत्यक्ष कामाच्या वेळी कोणतीही त्रुटी राहू नये. ही सर्व जय्यत तयारी आगामी १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या प्रत्यक्ष घरयादी आणि घरगणना मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी व्यवस्थित करण्यासाठी केली जात आहे.
आपल्याकडे येणाऱ्या प्रगणकांना वस्तुनिष्ठ आणि अचूक माहिती देऊन सहकार्य करावे…
ठाणे जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी या मोहिमेचे महत्त्व अधोरेखित करताना नागरिकांना आवाहन केले आहे की, जनगणना ही केवळ आकडेवारी नसून देशाच्या भविष्यातील नियोजनाचा पाया असल्याने, नागरिकांनी आपल्या दारी येणाऱ्या प्रगणकांना वस्तुनिष्ठ आणि अचूक माहिती देऊन सहकार्य करावे तसेच, नागरिकांना स्वतःची माहिती स्वतः भरण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या ‘Self Enumeration’ (स्व-गणनेच्या) सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.


























