
कल्याण | २५ जुलै :
सार्वजनिक गणेशोत्सव केवळ धार्मिक उत्सव न राहता तो समाजसेवेचा आणि संस्कृती संवर्धनाचा उत्सव ठरावा, या उद्देशाने कल्याणमधील दूधनाका गणेश प्रेमी मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवाची सुरुवात सामाजिक बांधिलकी जपत अनोख्या पद्धतीने केली. शनिवारी २५ जुलै रोजी मंडळाच्या कार्यालयात झालेल्या प्रथम मानाच्या पाटपूजन सोहळ्यात अनावश्यक खर्च टाळून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. (Wasteful Spending Avoided: Kalyan’s Dudhnaka Ganesh Premi Mandal Sets an Inspiring Example with a Socially Responsible Pat Poojan Ceremony)

गणेशोत्सवाच्या तयारीचा शुभारंभ भक्तीमय वातावरणात करण्यात आला. यावेळी गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करून शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले. तसेच गरजू मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या ‘आधार फाऊंडेशन’ शाळेला ब्लूटूथ स्पीकर भेट देण्यात आला. विविध सामाजिक, सेवाभावी संस्थांच्या अध्यक्षांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. तर येत्या काळात विविध गरजू विद्यार्थ्यांना शालेयोपयोगी वस्तूंचेही वाटप केले जाणार असल्याचे मंडळातर्फे सांगण्यात आले.

याप्रसंगी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, आजच्या काळात गणेशोत्सव अधिकाधिक सामाजिक जाणीव निर्माण करणारा व्हावा, हीच मंडळाची भूमिका आहे. संस्कृती जपत समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडणे, हा मंडळाचा सातत्याने प्रयत्न राहणार आहे.

“आजच्या काळात जिथे संख्या कमी होते, तिथे संस्कृती जपण्याची जबाबदारी अधिक मोठी होते. हीच सामाजिक जबाबदारी आपले मंडळ समर्थपणे पार पाडत आहे,” असा संदेश यावेळी देण्यात आला.

धार्मिक परंपरा, सामाजिक उत्तरदायित्व आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या पाटपूजन सोहळ्याचे उपस्थितांनी कौतुक केले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजहिताचे उपक्रम राबविण्याचा आदर्श दूधनाका गणेश प्रेमी मंडळाने यंदाही कायम राखला आहे.



























