Home ठळक बातम्या ‘क्रेडाई- एमसीएचआय’च्या मदतीने कल्याण डोंबिवलीतील बकाल रस्ता दुभाजकांचा होतोय कायापालट

‘क्रेडाई- एमसीएचआय’च्या मदतीने कल्याण डोंबिवलीतील बकाल रस्ता दुभाजकांचा होतोय कायापालट

पालिकेचा एक रुपयाही खर्च न होता दुभाजकांचे होतेय सुशोभीकरण

कल्याण डोंबिवली | ३० ऑक्टोबर
रस्ता दुभाजकांवर नागरिकांकडून जागोजागी मारलेल्या पान-गुटख्याच्या घाणेरड्या पिचकाऱ्यांच्या रंगकामामुळे दुभाजकांना आलेली अवकळा… आणि त्यामुळे शहराच्या बकालपणामध्ये पडलेली भर… कल्याण-डोंबिवली शहराच्या विविध चौकातील हे किळसवाणे दृश्य अनेक शहरप्रेमी नागरिकांना दररोज पाहायला मिळत होते आणि यामुळे तीव्र संताप व्यक्त होत होता. मात्र, हेच घाणेरडे झालेले रस्ता दुभाजक आता थेट कात टाकू लागले असून केडीएमसी (KDMC) आणि ‘क्रेडाई-एम सी एच आय’ (Credai MCHI KD) यांच्यात झालेल्या ५ वर्षांच्या विशेष भागीदारीअंतर्गत, शहरातील सुमारे ३० किलोमीटर लांबीच्या रस्ता दुभाजकांच्या सुशोभीकरण – पुनरुज्जीवनाच्या कामाला वेगाने सुरुवात झाली आहे. (CREDAI-MCHI Drives a Remarkable Transformation of Neglected Road Dividers Across Kalyan-Dombivli!)

आगामी दिवाळीचे औचित्य साधून विकासकांमार्फत संपूर्ण शहरातील दुभाजकांची एकाच वेळी रंगरंगोटी आणि स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर राबवली जात आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक-खाजगी भागीदारीचा (PPP) हा एक उत्कृष्ट नमुना ठरला असून यामुळे प्रशासकीय तिजोरीवर एक रुपयाचाही भार न पडता शहराची बकालपणातून सुटका होत आहे.

बकालपणा मिटवून शहराला नवा लूक…
कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि क्रेडाई- एमसीएचआय यांच्यात झालेल्या कराराच्या अटींनुसार, शहरातील सर्व ३0 किलोमीटर लांबीच्या दुभाजकांचे आधुनिक पद्धतीने सुशोभीकरण करणे आणि पुढील ५ वर्षे त्यांची नियमित निगा -देखभाल (Maintenance) राखण्याची संपूर्ण जबाबदारी विकासक उचलत आहेत. या बदल्यात विकासकांना या दुभाजकांवर अधिकृतपणे जाहिरात करण्याचे अधिकार देण्यात आले असून पान-सुपारीच्या पिचकाऱ्यांमुळे विद्रुप झालेल्या भिंती आणि दुभाजक आता स्वच्छ आणि सुंदर रूपात समोर येत असल्याची माहिती उद्यान विभागाचे प्रमुख संजय जाधव यांनी दिली.

दिवाळीपूर्वी रंगरंगोटीचे कडक बंधन…
केडीएमसीसोबत झालेल्या करारनाम्यानुसार, दरवर्षी दिवाळीपूर्वी सर्व रस्ता दुभाजकांची एकाच वेळी रंगरंगोटी करणे विकासकांना बंधनकारक करण्यात आले आहे. याच नियमाचे काटेकोर पालन करत, विकासकांनी सणासुदीच्या तोंडावर संपूर्ण ताकदीनिशी ही कामे हाती घेतली आहेत. सध्या मुख्य रस्ते आणि चौकांमधील दुभाजक आकर्षक रंगांनी नटत असून, यामुळे शहराच्या प्रवेशद्वारांना आणि अंतर्गत रस्त्यांना एक स्वच्छ, देखणा आणि शिस्तबद्ध लूक मिळत असल्याचे उद्यान विभागाचे प्रमुख संजय जाधव म्हणाले.

केडीएमसीची वार्षिक कोट्यवधींची बचत…
या संपूर्ण ३० किलोमीटर परिसरातील दुभाजकांचे सुशोभीकरण, स्वच्छता आणि पुढील ५ वर्षांची देखभाल जर महापालिकेला स्वतःच्या निधीतून करावी लागली असती, तर त्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च आला असता. मात्र, क्रेडाई-मॅचीसोबत केलेल्या या धोरणात्मक करारामुळे पालिकेचा हा कोट्यवधींचा वार्षिक खर्च शून्यावर आला आहे. वाचलेला हा निधी शहराच्या इतर पायाभूत सुविधांसाठी आणि विकासकामांसाठी वापरणे आता पालिकेला शक्य होणार असल्याची प्रतिक्रिया उद्यान विभागाचे प्रमुख संजय जाधव यांनी दिली.

दरम्यान प्रशासन आणि उद्योजक यांच्यातील हा सकारात्मक ताळमेळ कल्याण-डोंबिवलीच्या शाश्वत विकासासाठी आणि स्वच्छतेसाठी एक नवा मापदंड ठरत असून, शहरप्रेमी नागरिकांमधून या उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा