
कल्याण-डोंबिवलीसह मुंबई एमएमआरमध्ये रात्रीचे 13 वर्षांतील विक्रमी तापमान; बदलापुरातही यंदाच दोन विक्रम
कल्याण डोंबिवली | ३० मे :
एकीकडे दिवसा सूर्यदेव अक्षरशः आग ओकत असताना दिवसाप्रमाणेच आता रात्रीच्या तापमानावरही त्याचा मोठा परिणाम झालेला दिसत आहे. मुंबईसह संपूर्ण एमएमआर रिजनमध्ये गेल्या 13 वर्षांतील रात्रीचे सर्वाधिक तापमान 29 मे 2026 म्हणजेच काल नोंद झाले असून कल्याण डोंबिवली हे रात्रीच्या तापमान वाढीचे हॉट स्पॉट ठरल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी एलएनएनशी बोलताना दिली आहे. (daytime-heat-now-extends-into-the-night-kalyan-dombivli-records-highest-night-temperature-of-30-4c)
विशेष म्हणजे हा उष्णतेचा प्रभाव केवळ मुंबईपुरता मर्यादित नसून संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश (MMR) आणि उत्तर कोकण पट्ट्यात जाणवला. ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेल, अंबरनाथ, विरार, कर्जत आणि कर्जत परिसरात गेल्या अनेक वर्षांतील सर्वाधिक उष्ण रात्रींपैकी काही रात्रींची यावर्षी नोंद झाली आहे.
हवामान तज्ज्ञ अभिजीत मोडक यांच्या मते वातावरणातील वाढलेला आर्द्रतेचा स्तर, ढगाळ वातावरण आणि रात्रीच्या वेळी वाहणारे वारे यामुळे दिवसभर साचलेली उष्णता वातावरणात सहजपणे विरून जात नाही. परिणामी रात्रीचे तापमान अपेक्षेप्रमाणे खाली येत नसल्याने नागरिकांना दिवसाप्रमाणे रात्रीही प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
उत्तर कोकणातील अनेक शहरांमध्ये किमान तापमान हे २९ अंशांच्या वर राहिले. कल्याण-डोंबिवली येथे सर्वाधिक ३०.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल पनवेल-पलावा ३०.३ अंश, बिरवाडी ३०.२ अंश, अंबरनाथ-विरार ३०.१ अंश आणि ठाणे-नवी मुंबईमध्ये ३० अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
बदलापूरमध्येही रात्रीच्या तापमानाचे विक्रम यंदा दोनदा मोडले…
तर बदलापूरमध्येही गेल्या 13 वर्षांतील उच्चांकी रात्रीच्या तापमानाची नोंद झाली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार 2013 नंतरची सर्वाधिक किमान तापमानाची नोंद 29.8 अंश सेल्सिअस अशी 30 मे 2026 रोजी झाली. यापूर्वीचा विक्रम 29.4 अंश सेल्सिअस हा 26 मे 2026 रोजी नोंदवण्यात आला होता. विशेष म्हणजे अवघ्या चार दिवसांतच हा विक्रम मोडला गेला. त्याआधी 27 मे 2024 रोजी 29.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यामुळे बदलापूरमध्ये याच वर्षी दोनदा रात्रीच्या तापमानाचे विक्रम मोडले गेल्याचे स्पष्ट झाल्याचे मोडक यांनी सांगितले.
हवामानाच्या अंदाजानुसार, नैऋत्य मोसमी वारे (SWM) सक्रिय होईपर्यंत अशाच प्रकारच्या उष्ण आणि दमट रात्रींचा अनुभव नागरिकांना येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्माघात टाळण्यासाठी पुरेसे पाणी पिणे, आवश्यक तेवढाच बाहेरचा प्रवास करणे आणि आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याचेही अभिजीत मोडक यांनी सांगितले आहे.

























