Home ठळक बातम्या कल्याणातील भाजपच्या माजी नगरसेवकाची अनोखी भाऊबीज भेट; प्रभागात बसवणार ६०० सीसीटीव्ही

कल्याणातील भाजपच्या माजी नगरसेवकाची अनोखी भाऊबीज भेट; प्रभागात बसवणार ६०० सीसीटीव्ही

महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी संदीप गायकर यांचा उपक्रम

कल्याण, दि. 26 ऑक्टोबर :
भाऊबीजेच्या शुभमुहूर्तावर कल्याणमधील भाजपचे माजी नगरसेवक संदीप गायकर यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांना एक अनोखी भेट दिली आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी कल्याण पश्चिमेतील ७ नंबर प्रभागात तब्बल ६०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या त्रिपुरी पौर्णिमेपासून या उपक्रमाला प्रारंभ करणार असल्याची माहिती संदीप गायकर यांनी दिली आहे. (Former BJP corporator from Kalyan makes a unique gift to his sisters; 600 CCTVs to be installed in the ward)

शहरातील महिला – ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा, तसेच स्वच्छता राखण्यासाठी गायकर यांनी या उपक्रमाला सुरुवात केली आहे. “कचराकुंडी मुक्त प्रभाग” करण्याच्या उद्देशानेही हे कॅमेरे उपयोगी ठरणार आहेत. जे नागरिक रस्त्यावर कचरा टाकतील, घंटागाडी वेळेवर येते की नाही, याचे थेट निरीक्षणही या प्रणालीद्वारे केले जाणार आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे शाळांच्या परिसरात, चाळ भागात, मंदिर परिसरामध्ये, मुख्य रस्त्यांवर, चौकांमध्ये बसवले जाणार आहेत. विशेषतः बेतुरकर पाडा, ठाणेकर पाडा, फडके मैदान, काळा तलाव, सिद्धेश्वर आळी परिसर या ठिकाणी प्राधान्याने बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

संदीप गायकर यांनी सांगितले की, “भाऊबीज ही बहिणींच्या सुरक्षेची प्रतिकात्मक भावना आहे. म्हणूनच या निमित्ताने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा उपक्रम सुरू करत आहोत. हे कॅमेरे फक्त सुरक्षेसाठीच नाहीत, तर प्रभागातील स्वच्छता आणि शिस्त राखण्यासाठीही मदत करतील.”

तर या सकारात्मक उपक्रमाची सुरुवात सध्या 7 नंबर प्रभागातून करण्यात येत असून पुढील काळामध्ये कल्याण पश्चिमेतील सर्वच प्रभागांमध्ये हे सीसीटीव्ही बसवण्यासाठी आपण इतर सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांना सहभागी करून घेऊ असेही गायकर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान या अनोख्या सार्वजनिक उपक्रमामुळे प्रभागातील रहिवाशांना अधिक सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा