Home ठळक बातम्या कल्याणातील संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकादमीतून महाराष्ट्राचा संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना;

कल्याणातील संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकादमीतून महाराष्ट्राचा संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना;

सलग १८ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा व उच्च दर्जाच्या प्रशिक्षणासाठी ऐतिहासिक वाटचाल

कल्याण | २९ ऑक्टोबर
कल्याण येथील संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमीच्या वतीने महाराष्ट्राचा १६ खेळाडूंचा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा व उच्च दर्जाचे प्रशिक्षण घेण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे रवाना झाला आहे. अकॅडमीचा हा सलग १८ व्या वर्षी आयोजित करण्यात आलेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौरा असून, २५ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत हा दौरा पार पडणार आहे. (Maharashtra Cricket Team Departs for South Africa Tour from Kalyan’s Santosh Sports Cricket Academy)

या दौऱ्यात महाराष्ट्राचा संघ Minor Junior County Cricket T20 Tournament 2026 या १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणार आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून निवड झालेल्या प्रतिभावान खेळाडूंना या दौऱ्याच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळणार आहे.

या दौऱ्यामध्ये संघ दोन डे-नाईट सामने आणि आठ टी-२० डे सामने खेळणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मॉर्केल बंधू आणि लायन्स संघाचे प्रमुख प्रशिक्षक घर्नेत क्रुगर व कर्ट हुमन यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंना उच्च दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण मिळणार आहे. त्यामुळे युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव, आधुनिक प्रशिक्षण पद्धती आणि व्यावसायिक क्रिकेटमधील बारकावे शिकण्याची महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध होणार आहे.

या स्पर्धेचे आयोजन दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील प्रसिद्ध ईस्टर्न क्रिकेट अकॅडमी यांच्या वतीने करण्यात आले आहे. भारतीय युवा क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची आणि परदेशातील अनुभवी प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्याची संधी मिळावी, हा या दौऱ्यामागील प्रमुख उद्देश आहे.

या दौऱ्याचे प्रमुख म्हणून संतोष पाठक काम पाहणार असून, प्रशिक्षक म्हणून परेश दिलीप हिंदुराव आणि सहाय्यक प्रशिक्षक म्हणून अश्विनी योगेश चौधरी जबाबदारी सांभाळणार आहेत.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू विनोद कांबळी, आमदार श्री. संजय दत्त, श्री. बृजकिशोर दत्त आणि महाराष्ट्र क्रीडा धोरणाचे सदस्य श्री. अविनाश ओंबासे यांनी खेळाडूंची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या प्रोत्साहनामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला असून, या दौऱ्यात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी संघ सज्ज झाला आहे.

यावेळी दौऱ्याचे प्रमुख संतोष पाठक यांनी सांगितले की, “संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून गेली १८ वर्षे युवा क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची आणि दर्जेदार प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या दौऱ्यामुळे खेळाडूंना केवळ क्रिकेटचे तांत्रिक ज्ञान मिळणार नाही, तर शिस्त, संघभावना, आत्मविश्वास आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाचा अनुभवही मिळेल. भविष्यात भारतीय क्रिकेटसाठी सक्षम खेळाडू घडविण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वपूर्ण ठरेल.”

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना झालेले खेळाडू

१. सात्विक चेतन कारेकर
२. यश विठ्ठल भुरबुडा
३. मितांश अश्विन लोणे
४. कृष्णा धामी
५. किमया संदेश कदम
६. संचित संदीप गोरे
७. शौर्य सचिन शिर्के
८. राजवीर विलास कुटे
९. कविश योगेश चौधरी
१०. रुद्र शैलेंद्र मेढी
११. सलिल संतोष साटम
१२. कार्तिक अरुण लोखंडे
१३. सार्विल तुषार दिवाटे
१४. जयकृष्ण अशोक भोये
१५. रुद्र प्रथमेश दाहोत्रे
१६. आरव स्वप्निल कांबळे

प्रशिक्षक मंडळ
– संतोष पाठक – दौरा प्रमुख
– परेश दिलीप हिंदुराव – प्रशिक्षक
– अश्विनी योगेश चौधरी – सहाय्यक प्रशिक्षक

संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमीच्या या आंतरराष्ट्रीय दौऱ्यामुळे महाराष्ट्रातील युवा क्रिकेटपटूंना जागतिक क्रिकेटचा अनुभव मिळणार असून, भविष्यात राज्याचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी ही संधी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा