Home ठळक बातम्या मेट्रो मार्ग १२ अ प्रकल्पाला राज्य शासनाची मंजुरी ; कल्याण, शिळफाटा परिसरातील...

मेट्रो मार्ग १२ अ प्रकल्पाला राज्य शासनाची मंजुरी ; कल्याण, शिळफाटा परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार

मेट्रो मार्गिकेसह उड्डाणपुलांच्या डबल डेकर प्रकल्पाला राज्य शासनाची मान्यता, खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

कल्याण | २९ ऑक्टोबर
कल्याणफाटा, शिळफाटा आणि या परिसरातील वाहतूककोंडी दूर करून नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान, सुलभ आणि सुखकर करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या मेट्रो मार्ग १२ अ या विस्तारित मार्गिकेच्या प्रकल्पाला राज्य सराकराने मंजुरी दिली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि पुढाकारामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा मार्ग प्रशस्त होत असून, मेट्रो मार्गिकेसोबत उड्डाणपुलांची उभारणी अशा डबल डेकर अर्थात एकात्मिक वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे. तर मेट्रो मार्गिका आणि उड्डाणपूल असे एकात्मिक पद्धतीने हा प्रकल्प पूर्णत्वास जाणार आहे. येत्या दोन वर्षात या भागातील वाहतूक व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलणार आहे. (Maharashtra Government Approves Metro Line 12A Project; Major Relief Expected from Traffic Congestion in Kalyan and Shilphata)

मुंबई महानगर प्रदेशातील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, वाढती वाहनसंख्या आणि विविध शहरांमधील दैनंदिन प्रवासाची गरज लक्षात घेता, सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारणे ही काळाची गरज बनली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रो मार्ग १२ अ अर्थात मानपाडा – कल्याण फाटा – खुटारी गाव, तळोजा या विस्तारित मेट्रो मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी १८.४ किलोमीटर असून, त्यामध्ये १२ उन्नत मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. या मार्गिकेमुळे कल्याणमधील विविध भागांना तळोजा आणि पुढील महत्त्वाच्या वाहतूक मार्गांशी जोडण्यास मदत होणार आहे.

*गेमचेंजर डबल डेकर मार्गिकेची उभारणी
या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे मेट्रो मार्गिकेची उभारणी केवळ स्वतंत्र वाहतूक प्रकल्प म्हणून न करता, उड्डाणपुलांच्या बांधकामाशी तिची सांगड घालून डबल डेकर अर्थात एकात्मिक पायाभूत वाहतूक सुविधा विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कल्याण फाटा ते मानपाडा या दरम्यान शिळफाटा परिसरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी दोन मार्गिकांचा उन्नत रस्ता, तसेच कल्याण फाटा ते खुटारी गाव, तळोजा या भागात तीन अधिक तीन मार्गिकांचा उन्नत रस्ता उभारण्याचा प्रस्ताव या नियोजनाचा भाग आहे. मेट्रो आणि उन्नत रस्ते यांची एकत्रित उभारणी झाल्यामुळे या परिसरातील वाहतुकीची क्षमता वाढण्यास मदत होईल.

*वाहतूक कोंडीतून कायमची सुटका

या प्रकल्पामुळे कल्याण, डोंबिवली, शिळफाटा, मानपाडा, महापेकडे जाणारे प्रवासी आणि तळोजा परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. प्रवासाचा वेळ कमी होणे, वाहतूककोंडीमुळे होणारा इंधनाचा अपव्यय घटणे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढणे आणि औद्योगिक तसेच निवासी क्षेत्रांमधील संपर्क अधिक सुलभ होणे, असे अनेक फायदे या प्रकल्पातून अपेक्षित आहेत. त्याचबरोबर परिसरातील आर्थिक घडामोडींना चालना मिळून रोजगार आणि विकासाच्या नव्या संधी निर्माण होण्यासही मदत होईल. मुंबई महानगर प्रदेशाच्या भविष्यातील विकासाचा विचार करता, मेट्रो मार्ग १२ अ हा केवळ वाहतुकीचा प्रकल्प नसून, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई परिसराला अधिक सक्षमपणे जोडणारा महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्प ठरणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून या प्रकल्पाला मिळालेली गती आणि मेट्रो मार्गिकेसह उन्नत रस्त्यांच्या एकात्मिक विकासाचे नियोजन यामुळे परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात सकारात्मक बदल घडण्यास मोठी मदत होणार आहे.

इंटर कनेक्टिव्हिटी
या प्रकल्पाच्या नियोजनात मुंबई मेट्रो मार्ग १२, मेट्रो मार्ग ५ तसेच कल्याण-शिळफाटा आणि तळोजा परिसरातील अन्य महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांशी जोडणी करण्यावर भर देण्यात आला आहे. कल्याणफाटा ते राजनोली हा संपूर्ण मार्ग डबल डेकर प्रकारात विकसीत होणार आहे. तर कल्याण फाटा ते महापे उड्डाणपुलालाही या मार्गाशी जोडून इंटर कनेक्टिव्हिटी वाढवली जाणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प केवळ एका शहरापुरता मर्यादित न राहता मुंबई महानगर प्रदेशातील विविध शहरांदरम्यानची वाहतूक अधिक सक्षम करणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. भविष्यातील प्रवासीसंख्येचा विचार करून सार्वजनिक वाहतुकीचा विस्तार करणे आणि रस्त्यांवरील वाहनांचा ताण कमी करणे, या दोन्ही उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी ही एकात्मिक व्यवस्था महत्त्वाची ठरेल.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर एमएमआरडीएकडून मेट्रो मार्ग १२ अ आणि त्याच्याशी संबंधित उन्नत रस्ते व उड्डाणपुलांच्या एकात्मिक संरचना निश्चित करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या आर्थिक नियोजनामध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा सहभाग, राज्य शासनाकडून मिळणारे बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य तसेच विविध वित्तीय संस्थांकडून उभारण्यात येणारा निधी यांचा समावेश आहे. प्रकल्पासाठी आवश्यक निधीची उपलब्धता, जमीन संपादन, पुनर्वसन आणि बांधकामाच्या विविध टप्प्यांचे नियोजन करून प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला आहे.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण-डोंबिवलीसह संपूर्ण परिसरातील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. राज्य सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे कल्याण लोकसभेतील नागरिकांच्या वतीने आभार मानले आहेत.

एकूण लांबी – स्थानके…
या नवीन मेट्रो मार्गाची एकूण लांबी १८.४ किलोमीटर (डेपोच्या जोडणीसह) असेल आणि यावर मानपाडा, काटई नाका, ग्रोथ सेंटर, देसाई नाका, पडले गाव, कल्याण फाटा, गोठेघर गाव, दहिसर मोरी, दहिसर गाव, किरवली गाव, रोहिंजण आणि खुटारी गाव अशी एकूण १२ उन्नत स्थानके असतील.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा