Home ठळक बातम्या ‘यादिवशी’ कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा राहणार 24 तास बंद; El Nino मुळे...

‘यादिवशी’ कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा राहणार 24 तास बंद; El Nino मुळे पाऊस लांबण्याची शक्यतेने पाणी नियोजन सुरू

कल्याण डोंबिवली दि.6 मे :
भारतीय हवामान खात्याने यावर्षी अल निनो आणि आयओडीच्या प्रभावामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता व्यक्त केली असून त्याअनुषंगाने जलसाठ्याचे नियोजन करण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा २४ तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (“Water Supply in Kalyan-Dombivli to Remain Suspended for 24 Hours on This Day; Water Planning Initiated Due to Possible Delay in Monsoon Caused by El Niño”)

त्यानूसार येत्या सोमवारी 11 मे रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते मंगळवारी 12 मे रोजी रात्री 12 वाजेपर्यंत कल्याण आणि डोंबिवलीचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. परिणामी दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी 13 मे रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागू शकते असेही केडीएमसी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, बारावे जलशुद्धीकरण केंद्र, नेतिवली जलशुद्धीकरण केंद्र, मोहिली जलशुद्धीकरण केंद्र आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्र येथून होणारा पाणीपुरवठा मंगळवार दि. १२ मे २०२६ रोजी (सोमवार दि. ११ मे रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत) पूर्णपणे बंद राहणार आहे.

यामुळे कल्याण (पूर्व/पश्चिम), डोंबिवली (पूर्व/पश्चिम), शहाड, वडवली, अटाळी, आंबिवली तसेच मांडा-टिटवाळा परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. तसेच बुधवार दि. १३ मे रोजी पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे.

महापालिकेने नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याचे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. भविष्यात पाणीटंचाईची उग्र परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी ही उपाययोजना करण्यात येत असल्याचे पाणी पुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा