Home ठळक बातम्या केडीएमसी निवडणुकीतील बिनविरोध विजयाला कल्याण न्यायालयात आव्हान; मतदारांच्या अधिकारांवर गदा आल्याचा याचिकाकर्त्याचा...

केडीएमसी निवडणुकीतील बिनविरोध विजयाला कल्याण न्यायालयात आव्हान; मतदारांच्या अधिकारांवर गदा आल्याचा याचिकाकर्त्याचा दावा

कल्याण | 7 मे :
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या २० उमेदवारांच्या विजयाविरोधात कल्याण येथील दिवाणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. स्थानिक काँग्रेस नेते प्रकाश पगारे उर्फ मामा पगारे यांनी ही याचिका दाखल केली असून मतदारांना मतदानाचा तसेच ‘नोटा’ (NOTA) पर्याय वापरण्याचा घटनात्मक अधिकार नाकारण्यात आल्याचा गंभीर आरोप या याचिकेद्वारे करण्यात आला आहे.

या याचिकेनुसार, संबंधित प्रभागांमध्ये उमेदवार बिनविरोध घोषित करण्यात आले असले तरी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVM) उपलब्ध होती. तरीदेखील मतदान प्रक्रिया न घेता थेट उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आले, ज्यामुळे नागरिकांच्या लोकशाही हक्कांवर गदा आल्याचा दावा त्यात करण्यात आला आहे. याचिकाकर्त्यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९, निवडणूक नियम तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचा आधार घेत, मतदारांना आपले मत व्यक्त करण्याची संधी मिळणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी झालेल्या केडीएमसी निवडणुकीत शिवसेना आणि भाजप महायुतीच्या तब्बल २० उमेदवारांनी बिनविरोध विजय मिळवला आहे. मात्र या बिनविरोध विजयाला याचिकेद्वारे कायदेशीर आव्हान देण्यात आले आहे.

तर कल्याण न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी स्वीकारली असून विजयी नगरसेवकांसह राज्य निवडणूक आयोगालाही नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित २० प्रभागांतील निकाल रद्द करून पुन्हा मतदान घेण्याची मागणी याचिकेत करण्यात आली असून पुढील सुनावणी ८ जून रोजी होणार आहे. या खटल्यामध्ये ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. बी. जे. साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. जयेश बी. साळवी यांनी महत्त्वपूर्ण कायदेशीर दस्तावेजीकरण केले असून ॲड. उझैर ए. नजे यांनी ऑर्ग्युइंग काउन्सिल म्हणून घटनात्मक, निवडणूक आणि प्रशासकीय कायद्यांच्या आधारे न्यायालयात व्यापक मुद्दे उपस्थित केले आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा