
टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांची फेडरेशनच्या‘नॅशनल प्रेसिडेंट’पदी निवड
ठाणे दि.8 फेब्रुवारी :
“आज अनेक घरातील मुलांच स्वप्न असतं की आपण ही क्रिकेटर व्हाव; मात्र प्रत्येकालाच आयपीएल, टेस्ट मॅच किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत पोहोचता येत नाही. अशा अनेक तरुणांसाठी टेनिस क्रिकेट हे करिअर घडवणारं प्रभावी माध्यम ठरू शकतं. या फेडरेशनच्या माध्यमातून सर्व सामान्य मुलालाही खेळात स्वतःचं भविष्य घडवण्याची संधी मिळू शकते,” असे प्रतिपादन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा ठाणे येथे पार पडली. यावेळी ते बोलत होते. (Tennis Cricket Federation will help children realize their dream of becoming cricketers” – MP Dr. Shrikant Eknath Shinde)
यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांची फेडरेशनच्या ‘ राष्ट्रीय अध्यक्ष’ पदी अधिकृत निवड झाल्याचे देखील जाहीर करण्यात आले.
देशभरात वेगाने लोकप्रिय होत असलेल्या टेनिस क्रिकेटला राष्ट्रीय पातळीवर शिस्तबद्ध आणि अधिकृत व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया (ITCSF) ची स्थापना करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाला देशभरातील फेडरेशनचे पदाधिकारी, क्रीडा क्षेत्रातील प्रतिनिधी, स्पर्धा आयोजक, संघ मालक, माजी खेळाडू आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भारतातील टेनिस क्रिकेटच्या भविष्यातील वाटचालीचा सविस्तर आराखडा मांडण्यात आला. निवडीनंतर बोलताना डॉ. शिंदे म्हणाले, “कल्याण लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात टेनिस क्रिकेट खेळले जाते. अनेक मोठ्या स्पर्धा येथे आयोजित केल्या जातात. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा स्वतःला क्रिकेटर म्हणून घडवू शकतो. जे खेळाडू प्रोफेशनल पातळीवर क्रिकेट खेळू शकत नाहीत, त्यांच्यासाठी हे एक स्वतंत्र आणि सक्षम व्यासपीठ आहे.” ते पुढे म्हणाले, “गोविंदा-दहीहंडी सारख्या पारंपरिक खेळालाही ‘प्रो-गोविंदा’च्या माध्यमातून व्यावसायिक दर्जा देण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे. जो खेळ केवळ वर्षातून एकदाच खेळला जायचा, त्यालाही व्यासपीठ, ओळख आणि मान्यता मिळवून देण्यात आली. त्याचप्रमाणे कबड्डी आज ‘प्रो-कबड्डी’च्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे. म्हणजेच प्रत्येक खेळाला प्राधान्य देण्याची भूमिका आमच्या सरकारने घेतली आहे. टेनिस क्रिकेट हे आधीपासूनच वेगळ्या उंचीवर असून, त्याला व्यावसायिकदृष्ट्या सक्षम स्वरूप देण्यासाठी फेडरेशन सातत्याने प्रयत्न करेल.”
फेडरेशनच्या माध्यमातून दरवर्षी १२५ ते १५० स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असून, सुमारे ४० ते ४५ लाख खेळाडू या स्पर्धांमध्ये सहभागी होतात. या स्पर्धांची एकूण बक्षीस रक्कम अंदाजे ३० कोटी रुपयांच्या आसपास आहे. खेळाडूंना योग्य व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने आयोजक आणि फेडरेशन काम करत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
टेनिस क्रिकेटसाठी राष्ट्रीय पातळीवर शिस्तबद्ध व्यासपीठ…
टेनिस क्रिकेटमध्ये झपाट्याने होत असलेली वाढ आणि वाढती आर्थिक गुंतवणूक यामुळे या खेळाकडे तरुणांचा ओढा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, कोणत्याही अधिकृत नियंत्रण यंत्रणेअभावी काही ठिकाणी गैरप्रकार आणि अडचणी निर्माण होत असल्याचे चित्र होते. या पार्श्वभूमीवर देशभरातील स्पर्धा आयोजक, अनुभवी खेळाडू, प्रायोजक आणि संघ मालक एकत्र येऊन टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. फेडरेशनची सुरुवात २०२२ मध्ये झाली असून, ऑगस्ट २०२५ मध्ये कंपनी ॲक्ट सेक्शन ८ अंतर्गत बीसीसीआयच्या धर्तीवर फेडरेशनची अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, हरियाणा, दिल्ली एनसीआर, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांतील प्रतिनिधी फेडरेशनमध्ये सहभागी आहेत. येत्या काळात इतर राज्यांमध्येही फेडरेशनचा विस्तार करण्यात येणार आहे. टेनिस क्रिकेटला शिस्तबद्ध, पारदर्शक आणि व्यावसायिक स्वरूप देत, अनेक तरुणांच्या क्रिकेटर होण्याच्या स्वप्नांना नवी दिशा देण्याचा निर्धार या पहिल्याच सभेमध्ये व्यक्त करण्यात आला.

























