Home ठळक बातम्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीसह पूर्णाकृती पुतळ्याचे डोंबिवलीत अनावरण ; खा. डॉ. श्रीकांत...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीसह पूर्णाकृती पुतळ्याचे डोंबिवलीत अनावरण ; खा. डॉ. श्रीकांत शिंदे, भाजप कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची प्रमूख उपस्थिती

डोंबिवली दि.6 जून :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीसह बैठकरूपी पूर्णाकृती पुतळ्याचा भव्य असा अनावरण सोहळा काल सांस्कृतिक डोंबिवली नगरीमध्ये संपन्न झाला. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. (Unveiling of the full-length statue of Chhatrapati Shivaji Maharaj with a canopy in Dombivali)

विशेष म्हणजे आज असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वसंध्येला शिवगर्जना, ढोल-ताशा, लेझीम, घोडेनृत्य आदी देखण्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी यावेळी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून हा पुतळा साकारण्यात आला आहे.

1976 साली डोंबिवली नगरपरिषद असताना याठिकाणी दानशूर व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जुना पुतळा बसवला होता. याठिकाणी मेघडबंरीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात येण्याची मागणी केली जात होती. त्याचठिकाणी मेघडंबरीत स्थानापन्न झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या नव्या बैठकरूपी पूर्णाकृती पुतळ्याचे नूतनीकरण करून काल अनावरण करण्यात आल्याची माहिती खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दिली. याबद्दल आपण कल्याण डोंबिवली महापालिका आणि राज्य सरकारचा अभिनंदन व्यक्त करतो. ज्याप्रकारे या कल्याण डोंबिवलीमध्ये दळणवळण व्यवस्था काँक्रीटचे रस्ते, मेट्रो अशा विविध समाजउपयोगी विकासकामे सुरू आहेत. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचेही याठिकाणी अनावरण झालं याचे खूप समाधान असून छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा सर्व डोंबिवलीवासियांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल अशी भावनाही खा. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचेही धन्यवाद व्यक्त करत कल्याण डोंबिवलीला जेव्हा जेव्हा गरज लागली तेव्हा निधी देण्याचे काम राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी सुप्रसिद्ध गायक अभिजित जाधव आणि आमु जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यावर आधारित स्फूर्तीगीतांचे संयुक्त सादरीकरण करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.

या कार्यक्रमाला भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, आमदार सुलभा गायकवाड, राजेश मोरे, शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्यासह कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल, शहर अभियंता अनिता परदेशी यांच्यासह अनेक मान्यवर, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा