Home ठळक बातम्या शहाड पूल बंद, वाहतूक कोंडीच्या नरकयातना; नियोजनशून्य कारभाराचा नागरिकांना फटका

शहाड पूल बंद, वाहतूक कोंडीच्या नरकयातना; नियोजनशून्य कारभाराचा नागरिकांना फटका

कल्याण दि.5 नोव्हेंबर :

शहाड उड्डाणपूल दुरुस्तीच्या कामासाठी तब्बल 20 दिवस बंद करण्यात आला असून, त्याचा थेट फटका कल्याण परिसरातील नागरिक आणि वाहनधारकांना बसत आहे. शहाड पूल बंद झाल्याने सर्व वाहतुकीचा ताण आता वालधुनी पूल, पत्रिपुल आणि कल्याण पूर्वेकडील प्रमुख रस्त्यांवर आला आहे. परिणामी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरकडे जाणाऱ्या वाहनांची प्रचंड गर्दी दररोज दिसत असून, अवघ्या 10 ते 15 मिनिटांच्या प्रवासासाठी नागरिकांना दीड ते दोन तास रांगेत उभे रहावे लागत आहे. (With the Shahad bridge closed for repairs, commuters face hours-long jams and pothole-ridden roads. Citizens slam KDMC for poor planning and lack of preparedness)

शहाड उड्डाणपूल बंद होऊन केवळ दोन दिवस झाले असले तरी त्याचा परिणाम संपूर्ण कल्याण पश्चिम आणि पूर्वेतील वाहतुकीवर स्पष्टपणे जाणवत आहे. सर्वत्र वाहनांचा तांडा आणि हॉर्नांच्या आवाजाने रस्त्यांवर अक्षरशः गोंधळ उडाला आहे. यामुळे शाळा, ऑफिस, हॉस्पिटल अशा ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

यातच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. शहाड उड्डाणपूल बंद होणार हे प्रशासनाला आधीपासून माहित असूनही, पर्यायी मार्ग असलेल्या वालधुनी पुलावरील मोठमोठे खड्डे आजही भरलेले नाहीत. त्यामुळे वाहतूक कोंडीबरोबरच या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना अक्षरशः नरकयातना भोगाव्या लागत आहेत.

“शहाड पूल बंद करण्यापूर्वीच वालधुनी पुलाची दुरुस्ती केली असती तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती. नागरिकांचा विचार न करता प्रशासन जाणीवपूर्वक त्रास देत आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, वाहतूक पोलिसांनाही ताणाचा सामना करावा लागत असून, रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ नियंत्रित करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. मात्र, पर्यायी मार्गांची योग्य आखणी आणि खड्डेमुक्त रस्त्यांची सोय न झाल्यास, येत्या काही दिवसांत ही वाहतूक समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

१ कॉमेंट

  1. कल्याण प्रशासन आणि सर्व राजकीय पुढारी ह्यांना नियोजन म्हणजे काय माहीत आहेका? AC केबिन मध्ये आणि मोठ्या आलिशान गाड्यांच्या बाहेर नमस्कार येणार्‍यांना जनतेची गैरसोय काय समजणार?
    कल्याण स्टेशन परिसरातील कामाच्या प्रगती कडे बघून *सोय नको पण काम आवरा* असे वाटते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा