
बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रांतील विद्युत व यांत्रिक उपकरणांची देखभाल; नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन
कल्याण डोंबिवली | २४ सप्टेंबर :
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अखत्यारितील बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये विद्युत – यांत्रिक उपकरणांची देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामामुळे येत्या मंगळवारी २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत तब्बल १२ तास कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. (12-Hour Water Supply Shutdown in Kalyan-Dombivli on Tuesday; Maintenance and Repair Work at Water Treatment Plants)
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने याबाबत २३ सप्टेंबर रोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. देखभाल- दुरुस्तीची कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. या पाणीपुरवठा बंदचा परिणाम कल्याण पूर्व आणि पश्चिम परिसरासह कल्याण ग्रामीण भागातील विविध गावांवर तसेच डोंबिवली पूर्व आणि पश्चिम परिसरावर होणार आहे.
या भागांतील पाणी पुरवठा राहणार बंद…
पाणीपुरवठा बंदचा परिणाम कल्याण ग्रामीण विभागातील मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी तसेच इतर गावांवर होणार आहे. त्याचबरोबर कल्याण पूर्व-पश्चिम आणि डोंबिवली पूर्व -पश्चिम परिसराचाही पाणीपुरवठा यादिवशी बंद राहणार आहे.
महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रांमधील विद्युत – यांत्रिक यंत्रणांची नियमित देखभाल करणे आवश्यक असल्याने ही कामे हाती घेण्यात आली आहेत. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असला तरी काही भागांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.
नागरिकांना पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन…
या पार्श्वभूमीवर संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा तसेच आवश्यकतेनुसार पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवण्याचे आवाहन कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

























