
डोंबिवलीतील पिंपळेश्वर महादेव मंदिर परिसरात आयोजित कृतज्ञता सोहळ्यात दिली ग्वाही
डोंबिवली | ८ जून :
“महायुती सरकार हे सनातन धर्माचा पुरस्कार करणारे सरकार आहे. आम्ही कोणत्याही धर्माचा तिरस्कार करत नाही; मात्र जेव्हा जेव्हा सनातन धर्मावर संकट येईल, तेव्हा त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे काम हे सरकार निश्चितपणे करेल,” अशी ठाम ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. (We Respect All Religions, But If Sanatan Dharma Faces Any Threat, the Mahayuti Government Will Stand Firmly in Its Support” – Chief Minister Devendra Fadnavis)
डोंबिवलीतील पिंपळेश्वर महादेव मंदिर प्रांगणात श्री पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळातर्फे आयोजित कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी पिंपळेश्वर महादेव मंदिरासाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या हस्तांतरण प्रक्रियेचा उल्लेख करताना सांगितले की, या विषयाला मंत्रिमंडळात मान्यता मिळावी यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. “रवींद्र चव्हाण यांनी हा विषय सातत्याने लावून धरला. त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर व्हावा, अशी आग्रही भूमिका घेतली. त्यानंतर आपल्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सर्व मंत्रिमंडळ सदस्यांच्या सह्या घेऊन या प्रस्तावाला मान्यता दिली आणि आज ही संपूर्ण जमीन पिंपळेश्वर महादेव मंदिराला समर्पित झाली आहे,” असे फडणवीस यांनी सांगितले.
या निर्णयामुळे मंदिराचा ऐतिहासिक वारसा, परिसरातील आमराई तसेच येथे येणाऱ्या संत-भक्तांच्या परंपरेला नवसंजीवनी मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले. “पिंपळेश्वर महादेवाला त्याचा ऐतिहासिक गौरव पुन्हा प्राप्त करून देण्याचे काम आपण सर्वजण मिळून करू,” असेही ते म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मांडलेल्या विविध मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देत, राज्य सरकार या भागाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर कृतज्ञता सोहळ्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार डॉ श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे यांच्या उपस्थितीत पिंपळेश्वर महादेव मंदिरामध्ये महापूजा करण्यात आली.

























