
श्री पिंपळेश्वर मंदिराच्या जागेचा प्रश्न महायुती सरकारने मार्गी लावला – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
– कल्याण लोकसभा क्षेत्रात पॉडटॅक्सी सेवा सुरू करण्याची केली मागणी*
डोंबिवली | ८ जून :
कल्याण लोकसभा मतदारसंघातील ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा जपण्यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे हा संपूर्ण परिसर आता ‘आध्यात्मिक कॉरिडॉर’ म्हणून उदयास येत असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. पिंपळेश्वर महादेव मंदिर परिसरात आयोजित कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. (A Confluence of Faith, Culture and Development; Kalyan Lok Sabha Emerging as a ‘Spiritual Corridor’ – MP Dr. Shrikant Shinde)
“पिंपळेश्वर महादेवाच्या जागेसाठी गेली अनेक वर्षे विश्वस्त मंडळ, मंदिर ट्रस्ट, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि अनेक भाविकांनी संघर्ष केला. त्या संघर्षाला आता यश आले असून महायुती सरकारच्या नेतृत्वाखाली मंदिराच्या ४ एकर २५ गुंठे जागेचा प्रश्न मार्गी लागला आहे. आगामी काळात मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आवश्यक निधी आणि इतर विषयही सोडवले जातील,” असे प्रतिपादन खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले.
डोंबिवलीतील श्री तीर्थक्षेत्र पिंपळेश्वर महादेव देवस्थान मंदिराला नाममात्र दरात जागा हस्तांतरित करण्याच्या निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निमित्त आयोजित कृतज्ञता सोहळा आणि जाहीर सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी मोठ्या संख्येने भाविक, ग्रामस्थ, वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. खासदार शिंदे म्हणाले की, पिंपळेश्वर मंदिराच्या जागेसाठी अनेक वर्षे सातत्याने पाठपुरावा आणि संघर्ष सुरू होता. मंदिराच्या विकासासाठी जागा आणि निधी हे दोन महत्त्वाचे विषय होते. जागेचा प्रश्न मार्गी लागला असून भविष्यात मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेले सर्व निर्णय घेतले जातील.
कल्याण लोकसभेचा ‘आध्यात्मिक कॉरिडॉर’ म्हणून उदय…
यावेळी त्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात विविध धार्मिक स्थळांवरील विकासकामांचाही उल्लेख केला. खिडकाळी मंदिराचा जीर्णोद्धार सुरू असून, अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर परिसराचा विकासही प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. मलंगगड येथे फ्युनिक्युलर सेवेसह विविध सुविधा उभारण्यात आल्या असून दुर्गाडी मंदिरासह अनेक प्रलंबित धार्मिक स्थळांचे प्रश्न सोडविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कल्याण लोकसभा मतदारसंघात मोठ्या धार्मिक पर्यटन कॉरिडॉरची संकल्पना राबविण्यात येत असल्याचे सांगत त्यांनी अंबरनाथ मंदिर परिसरात वालधुनी नदीकाठच्या विकासाच्या धर्तीवर काम सुरू असल्याची माहिती दिली. भविष्यात निधीची आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निधी कमी पडू देणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच संत सावळाराम महाराज यांच्या भव्य स्मारकाला महायुती सरकारने मंजुरी दिली असून आगामी काळात पंचक्रोशीत हे स्मारक उभारले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उद्योगमंत्री उदय सामंत यांचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी आभार मानले.
कल्याण लोकसभेतही पॉडटॅक्सी सेवा सुरू करावी…
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाढती लोकसंख्या, वेगाने विकसित होत असलेली नागरी वसाहत आणि भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेता अत्याधुनिक पॉड टॅक्सी सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे. बीकेसी येथे सुरू करण्यात आलेल्या पॉड टॅक्सी प्रकल्पाच्या धर्तीवर कल्याण-डोंबिवली परिसरातही ही सेवा सुरू झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे त्यांनी नमूद केले. मेट्रो, रेल्वे आणि इतर सार्वजनिक वाहतूक सेवांना जोडणारी ही आधुनिक व्यवस्था सुरू झाल्यानंतर प्रवाशांना स्थानकापासून थेट आपल्या घरापर्यंत जलद, सुरक्षित आणि सुलभ प्रवास करता येणार आहे. तसेच वाहतूक जलद होण्यास मदत होऊन भविष्यातील स्मार्ट आणि आधुनिक शहराच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल, असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

























