Home बातम्या केडीएमटी कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन आणि प्रथमोपचाराचे प्रशिक्षण; ८५ कर्मचाऱ्यांचा सहभाग

केडीएमटी कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन आणि प्रथमोपचाराचे प्रशिक्षण; ८५ कर्मचाऱ्यांचा सहभाग

कल्याण | ८ जून :
कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन (केडीएमटी) उपक्रमाच्या गणेश घाट आगार येथे महाराष्ट्र शासनाच्या नागरी संरक्षण दलामार्फत “आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन, पुरविमोचन व प्रथमोपचार” या विषयावरील विनामूल्य प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. आपत्तीच्या काळात कर्मचाऱ्यांनी प्रभावीपणे प्रतिसाद देऊन प्रवाशांचे प्राण वाचवावेत, या उद्देशाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. (KDMT Employees Receive Training in Disaster Management, Fire Safety and First Aid; 85 Staff Members Participate)

परिवहन व्यवस्थापक डॉ. विजयकुमार व्दासे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सभागृह नेते वरुण पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी नागरी संरक्षण विभागाचे उपनियंत्रक डॉ. विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल गावित (उपनियंत्रक, नागरी संरक्षण), रमेश गोरे (उपमुख्य क्षेत्ररक्षक), डॉ. राहुल (मास्टर ट्रेनर), डॉ. प्रकाश ठमके, गौतम मोरे तसेच नागरी संरक्षण दलाच्या स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.

आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणामध्ये आग लागल्यास तातडीने घ्यावयाची काळजी, गॅस सिलेंडरचा स्फोट टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना, भूकंप व पुरासारख्या नैसर्गिक आपत्तींच्या वेळी स्वतःचा आणि प्रवाशांचा बचाव कसा करावा, तसेच सीपीआरद्वारे (CPR) प्रथमोपचार कसे द्यावेत याचे सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले.

या प्रशिक्षणात केडीएमटीचे सुमारे ८५ चालक, वाहक, महिला वाहक, यांत्रिक कर्मचारी तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. प्रशिक्षणादरम्यान विविध आपत्कालीन परिस्थितींची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

कार्यक्रमासाठी आगार व्यवस्थापक दीपक चौधरी, प्रमोद बागुल, रविंद्र संसारे आणि सुरक्षा अधिकारी भारत सांगळे यांनी विशेष सहकार्य केले. तसेच भरारी पथकातील राजेंद्र पातकर, प्रवीण देशमुख आणि बाळासाहेब एरंडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद जाधव यांनी केले, तर प्रभारी मार्ग तपासणीस तथा भरारी पथक प्रमुख संतोष हेरोडे यांनी आभार प्रदर्शन केले.

यावेळी परिवहन व्यवस्थापक डॉ. विजयकुमार व्दासे म्हणाले, “केडीएमटीच्या बसमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. आपत्तीच्या प्रसंगी कर्मचाऱ्यांनी घाबरून न जाता शास्त्रोक्त पद्धतीने कार्य केल्यास अनेक जीव वाचू शकतात. त्यामुळे अशा प्रकारचे प्रशिक्षण ही काळाची गरज असून भविष्यातही नियमितपणे आयोजित केले जाईल.”

सभागृह नेते वरुण पाटील यांनी प्रशिक्षणात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करत नागरी संरक्षण दलाचे आभार मानले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा