Home ठळक बातम्या ‘हार मानू नका’…कल्याणच्या तिघा धावपटूंकडून कॉम्रेड्स मॅरेथॉनच्या घोषवाक्याला साजेशी कामगिरी

‘हार मानू नका’…कल्याणच्या तिघा धावपटूंकडून कॉम्रेड्स मॅरेथॉनच्या घोषवाक्याला साजेशी कामगिरी

शारीरिक आणि मानसिक आघातानंतरही तिघांकडून सर्वात खडतर मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण

कल्याण | २० जून :
जगातील सर्वात खडतर आणि प्रतिष्ठित अल्ट्रामॅरेथॉन असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील Comrades Marathon 2026 मध्ये कल्याणच्या तिघा धावपटूंनी शारीरिक आणि मानसिक आघातांवर मात करून ही स्पर्धा पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे यंदाच्या स्पर्धेसाठी असणाऱ्या ‘हार मानू नका’ या ब्रीदवाक्याला साजेशी कामगिरी करत कल्याणच्या तिन्ही धावपटूंनी ही मॅरेथॉन गाजवली. (‘Never Give Up’: Three Kalyan Runners Live Up to the Spirit of the Comrades Marathon Motto)

डॉ. हरीश शहादपुरी यांनी १० तास १० मिनिटांत, डॉ. सोमनाथ बाभळे यांनी १० तास ५४ मिनिटांत तर संजय काळुखे यांनी ११ तास ३५ मिनिटांत ही ८५.७७ किलोमीटरची जीवघेणी शर्यत पूर्ण केली. मात्र या शर्यतीदरम्यान त्यांना आलेले अडथळे – अडचणी समजल्यानंतर तिघांबद्दल आणखी अभिमान वाटेल. जणू काही यामागे केवळ धावण्याची ताकद नाही तर संकटांवर मात करण्याची जिद्द आणि ‘हार मानू नका’ हाच जीवनमंत्र घेऊन हे तिघे कल्याणकर धावत होते.

हाड मोडले तरी हार नाही मानली…
स्पर्धेच्या १९व्या किलोमीटरवर असताना संजय काळुखे यांना मागून येणाऱ्या एका धावपटूचा जोरदार धक्का बसला. त्या धक्क्याने ते दोन ते तीन कोलांट्या उड्या मारत खाली पडले. ज्यामुळे त्यांच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. अशा प्रसंगी अनेक जण स्पर्धा अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतात. मात्र संजय यांनी हार न मानता शारीरिक वेदना, धक्का आणि मानसिक ताण यांवर मात करत पुन्हा धावायला सुरुवात केली. इतकेच नाही तर त्यांनी तब्बल ८५.७७ किलोमीटरची शर्यत वेळेत पूर्ण करत जिद्दीचा नवा आदर्श घालून दिला. विशेष म्हणजे, कल्याणात परतल्यानंतर करण्यात आलेल्या एक्स-रे तपासणीत त्यांच्या खांद्याचे हाड मोडल्याचे निदर्शनास आले. खांद्याचे हाड फ्रॅक्चर झालेले असताना शरीराची मुक्त हालचाल करणे आणि एवढ्या खडतर मार्गावर धावणे ही जवळपास अशक्य गोष्ट मानली जाते. मात्र प्रचंड वेदना सहन करत, ‘हार मानू नका’ या कॉम्रेड्स मॅरेथॉनच्या घोषवाक्याला अक्षरशः जगत संजय काळुखे यांनी ही शर्यत पूर्ण केली.

तर दुसरीकडे, डॉ. हरीश शहादपुरी यांच्यासमोरही वेगळे आव्हान होते. स्पर्धेच्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे या वर्षी कॉम्रेड्समध्ये सहभागी होता येईल की नाही, याबाबत मोठी अनिश्चितता निर्माण झाली होती. मानसिकदृष्ट्या कठीण अशा परिस्थितीतही त्यांनी धैर्य राखले. स्पर्धेसाठी रवाना होण्याच्या अवघ्या एक दिवस आधी त्यांच्या पत्नीला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आणि त्यानंतर त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा प्रवास केला. वैयक्तिक चिंतेच्या छायेतही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत १० तास १० मिनिटांत ही शर्यत पूर्ण केली आणि अढळ मानसिक क्षमतेचे दर्शन घडवले.

तसेच डॉ. सोमनाथ बाभळे यांनीही सातत्यपूर्ण तयारी, शिस्त आणि चिकाटीच्या जोरावर ही प्रतिष्ठित स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. RUNAHOLICS या रनिंग ग्रुपअंतर्गत सराव करणाऱ्या या तिघांना डॉ. योगेश सातव मार्गदर्शन लाभले असून अनेक महिन्यांच्या कठोर प्रशिक्षणानंतर त्यांनी जगातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या स्पर्धांपैकी एक स्पर्धा पूर्ण करत कल्याणचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा उज्ज्वल केले आहे.

कॉम्रेड्स मॅरेथॉनच्या यंदाच्या घोषवाक्यातील ‘हार मानू नका’ हा संदेश केवळ बॅनरवरच नव्हता, तर तो संजय काळुखे यांच्या जिद्दीत, डॉ. हरीश शहादपुरी यांच्या मानसिक ताकदीत आणि डॉ. सोमनाथ बाभळे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून जिवंत झाला. त्यामुळे ही केवळ शर्यत पूर्ण करण्याची कथा नसून, संकटांवर मात करून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणादायी कहाणी ठरली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा