
कल्याण, दि. २१ जून :
भारतीय जनता पक्षाच्या कल्याण जिल्हा कार्यकारिणीत युवा पदाधिकारी गणेश कारभारी यांची जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या नेतृत्वाखालील नव्या कार्यकारिणीत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या नव्या जबाबदारीबद्दल भाजपच्या भटके विमुक्त मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याकडून सत्कार करत गणेश कारभारी यांचे अभिनंदन करण्यात आले. (Ganesh Karbhari Appointed BJP Kalyan District Secretary; Felicitated by Former MLA Narendra Pawar, State President of the Nomadic & Denotified Tribes Front)
गणेश कारभारी हे पक्षातील सक्रिय आणि निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी भाजपच्या कल्याण शहर कार्यकारिणीत सरचिटणीस, उपाध्यक्ष तसेच भाजप कल्याण शहर ओबीसी सेल अध्यक्ष म्हणून चांगले काम करत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ज्यामध्ये विशेषतः लोकसभा निवडणूक तसेच महानगरपालिका निवडणुकीतही त्यांनी प्रामाणिकपणे पक्षाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या या संघटन कौशल्याचा आणि पक्षनिष्ठेचा विचार करून एका तरुण कार्यकर्त्याला संधी दिल्याबद्दल भाजप भटके विमुक्त मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार यांनी जिल्हाध्यक्ष नंदू परब यांचेहीआभार मानले. तसेच गणेश कारभारी यांचा सन्मान करून नरेंद्र पवार यांच्याकडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.
कल्याण पश्चिमेतील गांधारी गावातील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही गणेश कारभारी यांची ओळख आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला असून स्थानिक नागरिकांमध्ये त्यांची वेगळी छाप आहे. त्यासोबतच कल्याणात होणाऱ्या प्रमूख सांस्कृतिक कार्यक्रमांपैकी एक असलेल्या आगरी कोळी महोत्सवातही गणेश कारभारी यांचे सक्रिय योगदान आहे.
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना गणेश कारभारी म्हणाले की, “पक्षाने माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी पक्ष नेतृत्वाचा आभारी आहे. पक्षाने सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत भारतीय जनता पक्षाची विचारधारा, ध्येय-धोरणे आणि विकासाची भूमिका तळागाळातील कार्यकर्ते आणि नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध राहीन.”
त्यांच्या या नियुक्तीबद्दल भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गांधारी परिसरातील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

























