Home ठळक बातम्या ज्येष्ठ नागरिकांनो, हृदयविकार अंगावर काढू नका; आधुनिक उपचारांमुळे निरोगी आयुष्य शक्य

ज्येष्ठ नागरिकांनो, हृदयविकार अंगावर काढू नका; आधुनिक उपचारांमुळे निरोगी आयुष्य शक्य

कल्याणच्या जी प्लस हार्ट रुग्णालयात वयस्कर रुग्णांवर यशस्वी अत्याधुनिक हृदय उपचार

कल्याण | १६ ऑगस्ट :
वाढते वय म्हणजे आजारपण अटळ, अशी समजूत आजही अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये आढळून येते. विशेषतः हृदयविकाराची लक्षणे जाणवू लागल्यानंतर, “आता वय झाले आहे, उपचार करून काय उपयोग?” असा गैरसमज करून अनेक जण वेदना आणि त्रास अंगावर काढतात. काही वेळा कुटुंबीयही वयोमानामुळे शस्त्रक्रिया किंवा उपचारांविषयी साशंक असतात. परिणामी अनेक ज्येष्ठ नागरिक वेळेत योग्य उपचारांपासून वंचित राहतात आणि त्यांच्या आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. (Senior Citizens, Don’t Ignore Heart Disease; Modern Treatments Can Help You Lead a Healthy Life)

अनेक शस्त्रक्रिया आता ज्येष्ठ नागरिकांसाठीही सुरक्षित पर्याय…
मात्र, गेल्या काही वर्षांत हृदयरोग उपचार क्षेत्रात झालेल्या वैद्यकीय प्रगतीमुळे परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवी तज्ज्ञांच्या मदतीने बायपास सर्जरी, अँजिओप्लास्टी, पीटीसीए (PTCA), तसेच कॉम्प्लेक्स बायफरकेशन आणि ट्रायफरकेशन अँजिओप्लास्टी यांसारख्या गुंतागुंतीच्या उपचारपद्धती आज अधिक सुरक्षित, प्रभावी आणि यशस्वीपणे केल्या जात आहेत. त्यामुळे पूर्वी धोकादायक मानल्या जाणाऱ्या अनेक शस्त्रक्रिया आता ज्येष्ठ नागरिकांसाठीही सुरक्षित पर्याय ठरत आहेत.

जी प्लस हार्ट रुग्णालयात अनेक ज्येष्ठ नागरिकांवर हृदयाशी संबंधितयशस्वी अत्याधुनिक शस्त्रक्रिया…
कल्याण येथील जी प्लस हार्ट रुग्णालयात गेल्या तीन वर्षांत अनेक ज्येष्ठ नागरिकांवर हृदयाशी संबंधित विविध अत्याधुनिक शस्त्रक्रिया आणि उपचार यशस्वीपणे करण्यात आले आहेत. या उपचारांमुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळाले असून, ते पुन्हा एकदा दैनंदिन जीवन सक्रियपणे आणि आनंदाने जगत आहेत.

वय हा उपचार न करण्याचा निकष नाही…
जी प्लस हार्ट रुग्णालयातील हृदयरोगतज्ज्ञांच्या मते, वय हा उपचार न करण्याचा निकष नसतो. रुग्णाची एकूण शारीरिक स्थिती, हृदयाची कार्यक्षमता, आवश्यक तपासण्यांचे निष्कर्ष आणि इतर वैद्यकीय बाबींचे सखोल मूल्यांकन करून प्रत्येक रुग्णासाठी योग्य उपचारपद्धती निश्चित केली जाते. त्यामुळे छातीत दुखणे, चालताना किंवा जिना चढताना धाप लागणे, लवकर थकवा जाणवणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा हृदयविकाराची इतर लक्षणे दिसत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने हृदयरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

ज्येष्ठ नागरिक तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी उपचारांबाबत भीती, गैरसमज बाळगू नये…
वेळेत निदान आणि योग्य उपचार मिळाल्यास हृदयविकारावर प्रभावी नियंत्रण मिळवता येते, गंभीर गुंतागुंत टाळता येते आणि रुग्णाचे जीवनमानही लक्षणीयरीत्या सुधारता येते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी भीती, गैरसमज किंवा केवळ वयोमानाचा विचार न करता आधुनिक वैद्यकीय उपचारांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

वैद्यकीय शास्त्रातील प्रगतीमुळे हृदयविकारावर परिणामकारक आधुनिक उपचार उपलब्ध…
वैद्यकीय शास्त्रात झालेल्या सातत्यपूर्ण प्रगतीमुळे आज हृदयविकारावर परिणामकारक अशा विविध आधुनिक उपचारपद्धती उपलब्ध झाल्या आहेत. अत्याधुनिक उपकरणे, सुधारित शस्त्रक्रिया तंत्रज्ञान आणि अनुभवी हृदयरोगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे हृदयावरील शस्त्रक्रियांचे यशाचे प्रमाण वाढले असून, मृत्युदर आणि शस्त्रक्रियेनंतर होणाऱ्या गुंतागुंतीही लक्षणीयरीत्या कमी झाल्या आहेत. परिणामी अनेक रुग्ण पूर्वीपेक्षा कमी कालावधीत दैनंदिन आयुष्यात परतू शकत असल्याची अनेक उदाहरणे समोर असल्याचे जी प्लस हार्ट रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे आज कमी त्रासदायक (Minimally Invasive) उपचार उपलब्ध…
तर पूर्वी किडनीचे आजार, पक्षाघात (पॅरालिसिस), फुफ्फुसांचे गंभीर आजार किंवा इतर सहव्याधी असलेल्या रुग्णांमध्ये बायपास शस्त्रक्रिया करणे अधिक जोखमीचे मानले जात असे. मात्र, आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे अशा निवडक रुग्णांसाठीही अँजिओप्लास्टीसारखे पर्यायी आणि कमी त्रासदायक (Minimally Invasive) उपचार उपलब्ध झाले आहेत. प्रत्येक रुग्णाची वैद्यकीय स्थिती, तपासण्यांचे निष्कर्ष आणि जोखमीचे मूल्यांकन करून त्याच्यासाठी सर्वात सुरक्षित व प्रभावी उपचारपद्धती निश्चित केली जाते. त्यामुळे अनेक गुंतागुंतीच्या रुग्णांनाही आज यशस्वी उपचारांची संधी उपलब्ध होत असल्याचा महत्त्वाचा मुद्दाही त्यांनी यावेळी अधोरेखित केला आहे.

“ज्येष्ठ नागरिकही निरोगी, सक्रिय आणि आनंदी आयुष्य जगू शकतात”
“हृदयविकाराचे निदान झाले म्हणजे आयुष्य थांबत नाही. वेळेत योग्य उपचार, नियमित औषधोपचार, संतुलित आहार, व्यायाम आणि जीवनशैलीतील आवश्यक बदल यामुळे ज्येष्ठ नागरिकही निरोगी, सक्रिय आणि आनंदी आयुष्य जगू शकतात. त्यामुळे वय हा उपचार न करण्याचा निकष नसून, योग्य वेळी योग्य उपचार घेणे हाच सर्वात महत्त्वाचा निर्णय आहे,” असा संदेश जी प्लस हार्ट रुग्णालयातील हृदयरोगतज्ज्ञांनी दिला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा