
क्रीडा संकुल, नाट्यगृह, सभागृहांसह आरोग्य प्रकल्पांचा घेतला आढावा
डोंबिवली | २४ ऑगस्ट :
कल्याण लोकसभा मतदारसंघातील डोंबिवलीमध्ये सुरू असलेल्या विविध महत्त्वाकांक्षी विकासकामांची खासदारडॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. शहरातील नागरिकांना आधुनिक, दर्जेदार आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या या प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्यासोबतच त्यांच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड होऊ नये, अशी कडक तंबी खा. डॉ. शिंदे यांनी संबंधित अधिकारी आणि यंत्रणांना दिली. (“No Compromise on the Quality of Development Works”; MP Dr. Shrikant Shinde Inspects Major Development Projects in Dombivli)
नानासाहेब धर्माधिकारी सभागृहाचे कामही वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना…
डोंबिवली पश्चिम येथील महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी सभागृहाच्या सुरू असलेल्या कामाचीही पाहणी करण्यात आली. सभागृहाचे काम नियोजित पद्धतीने आणि वेगाने पूर्ण करून ते लवकरात लवकर नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या. आरोग्य सुविधांसाठी सुतिकागृह आणि कॅन्सर रुग्णालय महत्त्वाचे डोंबिवली शहरात उभारण्यात येत असलेल्या सुतिकागृह आणि कॅन्सर रुग्णालयाच्या कामांचाही खासदार डॉ. शिंदे यांनी आढावा घेतला. नागरिकांना अत्यावश्यक आरोग्य सुविधा आपल्या शहरातच उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने हे दोन्ही प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. दोन्ही प्रकल्पांची कामे जलदगतीने पूर्ण करण्यासोबतच बांधकाम आणि सुविधांच्या गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड होऊ नये, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
अत्याधुनिक क्रीडा संकुलाच्या कामाला गती देण्याचे निर्देश…
डोंबिवलीतील हभप संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलासह खासदार डॉ. शिंदे यांनी सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. देशातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक क्रीडा संकुलांपैकी एक म्हणून या प्रकल्पाची उभारणी करण्यात येत असून, यामध्ये स्विमिंग पूलसह विविध क्रीडा सुविधांचा समावेश आहे. हे क्रीडा संकुल २०२७ पर्यंत पूर्ण करून नागरिकांच्या सेवेत दाखल करण्याच्या दृष्टीने कामाला अधिक गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले. कामाची गती वाढवतानाच बांधकामाचा दर्जा आणि गुणवत्ता कायम राखली जावी, यावरही त्यांनी विशेष भर दिला.
डोंबिवलीच्या सांस्कृतिक क्षेत्राला मिळणार नवी दिशा…
सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या सुरू असलेल्या कामाचीही खासदार डॉ. शिंदे यांनी पाहणी केली. नाट्यगृहातील स्टेज आणि आसन व्यवस्थेची कामे अंतिम टप्प्याकडे वेगाने वाटचाल करत आहेत.
डोंबिवलीच्या समृद्ध सांस्कृतिक क्षेत्राला आणखी बळ मिळावे, यासाठी नाट्यगृह परिसरात आर्ट गॅलरी, सुमारे २०० आसनक्षमतेचे मिनी नाट्यगृह तसेच कलाकारांना सरावासाठी प्रॅक्टिस हॉल उभारण्याच्या सूचना त्यांनी केल्या. या सुविधांचा समावेश करून आवश्यक आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे नाट्य, संगीत, चित्रकला आणि विविध कलाक्षेत्रांतील कलाकारांना एकाच ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
डोंबिवलीच्या विकासाचा वेग कायम ठेवताना क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य आणि नागरी सुविधांचा समतोल विकास करण्यावर भर दिला जात असल्याचे या पाहणी दौऱ्यातून स्पष्ट झाले. प्रकल्पांची केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि कामांचा दर्जा यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना यंत्रणेला देण्यात आल्या.
यावेळी आमदार राजेश मोरे, कल्याण-डोंबिवलीच्या महापौर हर्षाली चौधरी, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे यांच्यासह स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी आणि महापालिका अधिकारी उपस्थित होते.

























