Home ठळक बातम्या विद्यार्थीच बनले शिक्षक; कल्याणात बालक मंदिर संस्थेच्या प्राथमिक शाळेत अनोख्या पद्धतीने शिक्षक...

विद्यार्थीच बनले शिक्षक; कल्याणात बालक मंदिर संस्थेच्या प्राथमिक शाळेत अनोख्या पद्धतीने शिक्षक दिन साजरा

कल्याण | ३ सप्टेंबर २०२६ :
गुरु-शिष्य परंपरेला भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर त्यांना जीवनाची योग्य दिशा दाखवून भविष्यासाठी घडवत असतात. शिक्षकांच्या याच महत्त्वाची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी बालक मंदिर संस्था, कल्याण प्राथमिक शाळेत यंदाचा शिक्षक दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. इयत्ता तिसरी आणि चौथीतील विद्यार्थ्यांनी चक्क शिक्षकांची भूमिका साकारत आपल्या सहाध्यायांना विविध विषयांचे धडे दिले.

भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी, म्हणजेच ५ सप्टेंबर रोजी देशभर शिक्षक दिन साजरा केला जातो. याचे औचित्य साधून शाळेत ३ सप्टेंबर रोजी या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रमाणे पोशाख करून शाळेत हजेरी लावली. इयत्ता तिसरी आणि चौथीतील विद्यार्थ्यांना विविध वर्गांची जबाबदारी देण्यात आली. आपल्या परीने शिक्षकाची भूमिका समजून घेत विद्यार्थ्यांनी गाणी, गोष्टी, चित्रकला, इतिहास, गणित, इंग्रजी आदी विषय शिकवण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने वर्गासमोर उभे राहत विषय समजावून सांगताना शिक्षकांच्या भूमिकेचा अनुभव घेतला.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षक होणे किती आव्हानात्मक आणि जबाबदारीचे काम आहे, याची प्रत्यक्ष अनुभूती मिळाली. कार्यक्रमाच्या समारोपावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना “शिक्षक आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे याबद्दल भावना व्यक्त केल्या. शिक्षकांच्या मार्गदर्शनातूनच भविष्यातील डॉक्टर, अभियंते, शास्त्रज्ञ, लेखक, शिक्षक तसेच विविध क्षेत्रांत देशाचे नाव उंचावणारी सक्षम पिढी घडते, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पवार आणि शालेय समितीचे अध्यक्ष दीपक परब यांच्या मार्गदर्शनानुसार या उपक्रमाची आखणी करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांची विशेष तयारी करून घेतली. शाळेच्या वरिष्ठ शिक्षिका प्रतिभा मोरे यांनी शिक्षक तसेच विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले.

या उपक्रमाला संस्थेचे पदाधिकारीही उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत घेतलेला हा अनुभव त्यांच्या आत्मविश्वासासोबतच शिक्षकांविषयीचा आदर आणि कृतज्ञतेची भावना अधिक दृढ करणारा ठरला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा