Home ठळक बातम्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निर्देशानंतर केडीएमसी ॲक्शन मोडमध्ये; कल्याण-डोंबिवलीतील १५ प्रमुख...

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निर्देशानंतर केडीएमसी ॲक्शन मोडमध्ये; कल्याण-डोंबिवलीतील १५ प्रमुख रस्ते होणार अतिक्रमणमुक्त!

३० नोव्हेंबरपर्यंत अतिक्रमणे स्वतःहून हटविण्याची मुदत; त्यानंतर निष्कासन व दंडात्मक कारवाई – महापालिकेची जाहीर सूचना

कल्याण डोंबिवली | २८ नोव्हेंबर
कल्याण-डोंबिवली शहरातील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि पदपथांवरील अनधिकृत बांधकामांच्या समस्येवर आता महापालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. शहरातील १५ प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने विशेष मोहीम हाती घेतली असून, यासंदर्भात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम २३१ अन्वये अधिकृत जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. (Following MP Dr. Shrikant Shinde’s Directives, KDMC Goes into Action Mode; 15 Major Roads in Kalyan-Dombivli to Be Made Encroachment-Free!)

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिळफाटा ते दुर्गाडीपर्यंतच्या संपूर्ण मार्गावरील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे हटविण्याचे स्पष्ट निर्देश केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांना दिले होते. या निर्देशांची तत्काळ दखल घेत केडीएमसी प्रशासनाने आता शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांविरोधात कंबर कसली आहे. महापालिकेच्या या निर्णयाचे कल्याण-डोंबिवलीतील करदात्या नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

शहरातील प्रमुख रस्ते, पदपथ तसेच पदपथालगतच्या मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणात टपऱ्या, शेड, अनधिकृत बांधकामे आणि विविध प्रकारची अतिक्रमणे झाल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. या अतिक्रमणांमुळे रस्त्यांवरील वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, पादचाऱ्यांनाही रस्त्यावरून चालण्याची वेळ येत आहे. तसेच अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर बनत आहे. याशिवाय काही अनधिकृत बांधकामांमध्ये हॉटेल्स, गॅरेजेस आदी व्यावसायिक उपक्रम आवश्यक अग्निसुरक्षा व इतर परवानग्यांशिवाय सुरू असल्याने नागरिकांच्या जीविताला आणि वित्ताला धोका निर्माण होण्याची शक्यता महापालिकेने व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी आणि पादचाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे हटविण्याची विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


कल्याण-डोंबिवलीतील या १५ प्रमुख मार्गांवरील अतिक्रमणांवर कारवाई
महापालिकेने जाहीर केलेल्या सूचनेनुसार खालील प्रमुख रस्ते आणि मार्गांवरील अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत.

१. पत्री पूल – पिसवली – मानपाडा – सोनारपाडा – काटई नाका.

२. डोंबिवली रेल्वे स्थानक – मानपाडा रोड.

३. डोंबिवली पूर्व – छत्रपती शिवाजी महाराज चौक (घरडा चौक) – ठाकुर्ली – कचोरे – पत्री पूल (९० फूट रस्ता).

४. कल्याण रेल्वे स्थानक पश्चिम – प्रेम ऑटो – शहाड.

५. कल्याण रेल्वे स्थानक – शिवाजी चौक – सहजानंद चौक – दुर्गाडी चौक / पूल.

६. सहजानंद चौक – बेतूरपाडा / बिर्ला कॉलेज – खडकपाडा.

७. दुर्गाडी – गांधारी – बारावे – अटाळी – टिटवाळा.

८. कल्याण पूर्व – तिसगाव – चक्की नाका.

९. चक्की नाका – नेतिवली नाका.

१०. डोंबिवली रेल्वे स्थानक पश्चिम – मोठागाव – रेतीबंदर.

११. काटेमानिवली – सिद्धार्थ नगर – म्हसोबा चौक – तिसगाव नाका.

१२. संतोषी माता रोड, कल्याण पश्चिम.

१३. स्मार्ट सिटी रोड (गोदरेज हिल – निक्की नगर – रोनक सिटी).

१४. दुर्गाडी चौक – खडकपाडा – बिर्ला कॉलेज – प्रेम ऑटो.

१५. मोहिंदरसिंग काबुलसिंग रोड.

३० नोव्हेंबरपूर्वी अतिक्रमणे स्वतःहून हटविण्याचे आवाहन
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या जाहीर सूचनेनुसार, वरील प्रमुख रस्त्यांसह महानगरपालिका क्षेत्रातील अन्य सार्वजनिक रस्ते, पदपथ आणि पदपथालगतच्या मोकळ्या जागांमध्ये अतिक्रमणे किंवा अनधिकृत बांधकामे केलेल्या संबंधित व्यावसायिकांनी ती दिनांक ३० नोव्हेंबर २०२६ पूर्वी स्वतःहून हटवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. निर्धारित मुदतीत संबंधितांनी अतिक्रमणे न हटविल्यास महापालिकेकडून कायदेशीर व दंडात्मक कारवाई करून ती निष्कासित करण्यात येणार आहेत. तसेच अतिक्रमणे हटविण्यासाठी झालेला खर्च संबंधित जबाबदार व्यक्तींकडून वसूल करण्यात येणार असल्याचेही जाहीर सूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या जाहीर सूचनेनंतर संबंधित अतिक्रमणधारक आणि अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना स्वतंत्रपणे वैयक्तिक नोटीस अथवा सूचना दिल्या जाणार नसल्याचेही महापालिकेने नमूद केले आहे.

अतिक्रमणमुक्त रस्त्यांची नागरिकांची अपेक्षा…
कल्याण-डोंबिवली शहरातील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि पदपथांवरील अनधिकृत व्यवसाय यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निर्देशानंतर महापालिकेने घेतलेली ही भूमिका आणि सुरू केलेली कार्यवाही महत्त्वपूर्ण मानली जात आहे. मात्र, केवळ जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यापुरती ही मोहीम मर्यादित न राहता प्रत्यक्ष रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून त्याठिकाणी पुन्हा अतिक्रमणे होणार नाहीत, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा