
कल्याण | १७ ऑक्टोबर
महात्मा फुले आज हयात असते तर धर्माच्या नावावर सुरू असलेल्या गोंधळावर, ढोंगबाजीवर कडाडून आसूड ओढण्यासाठी डिजीटल सत्यधर्म नावाचे प्लॅटफॉर्म खुले केले असते. तसेच धर्माच्या नावाने सुरू असलेल्या अनाचारावर या माध्यमातून झोड उठवली असती, असे मत प्रसिध्द पत्रकार किरण सोनावणे यांनी क्रांतिज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त कल्याण येथील शेठ हिराचंद मुथा महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळातर्फे १६ ऑवटोबर रोजीी आयोजित विशेष व्याख्यानात मांडले. (“…Then Mahatma Phule Would Have Launched a Digital Satyadharma” – Kiran Sonawane)
यावेळी महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रकाश मुथा, मुंबई-कोकण विभाग शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे, प्राचार्या अनुजा ब्रह्मे, आयक्यूएसी प्रमुख डॉ. अजय पिल्ले, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
महात्मा फुले हे पुणे नगरपालिकेत नगरसेवक होते. तेव्हा खडकवासला धरणाचे काम सुरू होते. या कामात अधिकाऱ्याने भ्रष्टाचार केल्याची तक्रार त्या काळातील नावाजलेले कंत्राटदार महात्मा फुले यांनी केली होती. सत्य मांडण्यासाठी ते घाबरले नाही. आज महात्मा फुले हयात असते तर त्यांनी निकृष्काठ काम करणाऱ्या ठेकेदार कम आमदार, ठेकेदारकम नगरसेवक यांना तुरुंगात डांबा, असा कायदा केला असता, असेही सोनावणे यांनी सांगितले. समाजातील अंधश्रद्धा, जातिभेद आणि विषमता यांविरुद्ध लढा देत महात्मा फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा मार्ग दाखविला. त्यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी आहेत, असे महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रकाश मुथा यांनी सांगितले.
या व्याख्यानांमुळे विद्यार्थ्यांना महात्मा फुले यांच्या कार्याची आणि विचारांची माहिती मिळाली.तसेच सामाजिक बांधिलकी, समता आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित झाले. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संदेशही या कार्यक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कविता भागवत यांनी केले.


























