Home ठळक बातम्या डोंबिवलीत जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न; ५५ शाळांमधील २४० खेळाडूंचा सहभाग

डोंबिवलीत जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न; ५५ शाळांमधील २४० खेळाडूंचा सहभाग

कल्याण डोंबिवली | २२ ऑक्टोबर
क्रीडा व युवक सेवा संचालनालय (महाराष्ट्र राज्य, पुणे), जिल्हा क्रीडा परिषद (ठाणे) आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडली. डोंबिवली येथील रीजन्सी अनंतम येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील ५५ शाळांमधील तब्बल २४० खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.(District-Level Skating Championship Concludes with Great Enthusiasm in Dombivli; 240 Players from 55 Schools Participate)

ही स्पर्धा प्रामुख्याने ११, १४, १७ आणि १९ वर्षांखालील वयोगटात खेळवण्यात आली. या जिल्हास्तरीय स्पर्धेत विजयी ठरलेले खेळाडू आगामी मुंबई विभागीय स्केटिंग स्पर्धेत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व करणार आहेत, अशी माहिती महापालिकेचे क्रीडा अधिकारी प्रवीण कांबळे यांनी दिली.

दिमाखदार उद्घाटन आणि पारितोषिक वितरण:
स्पर्धेचे उद्घाटन ग्लोबल कॉलेजच्या प्राचार्या सुप्रिया नाईकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी दशरथ आगवणे, राजू घुले, प्रसाद दार्वेकर आणि लीना करपे आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचा अंतिम पारितोषिक वितरण समारंभ रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सौदामिनीच्या अध्यक्षा शीतल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. या संपूर्ण आयोजनासाठी मुख्य पंच गीतेश वैद्य, स्केटिंग प्रशिक्षक रफिक अन्सारी, सागर कुलदीप, पवन ठाकूर, मोहित बजाज, गुप्राण शेख आणि मनीषा गावकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

“कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात स्केटिंग खेळाला मिळणारा प्रतिसाद अत्यंत कौतुकास्पद आहे. आज आपल्या भागात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होत आहेत. मात्र, महापालिका क्षेत्रात हक्काची ‘स्केटिंग रिंग’ उपलब्ध नसल्यामुळे खेळाडूंना सरावासाठी वसई-विरार किंवा नवी मुंबई गाठावी लागते. मुंबई विभागामध्ये आपल्या महापालिकेचे खेळाडू नेहमीच अव्वल ठरतात. हा दैदिप्यमान परफॉर्मन्स पाहता, महानगरपालिकेने स्थानिक पातळीवर स्केटिंग रिंग विकसित करण्यासाठी त्वरित प्रयत्न करणे गरजेचे आहे.” — अविनाश ओंबासे (सचिव, स्केटिंग संघटना)

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा