Home ठळक बातम्या ठाणे जिल्ह्यात रंगणार मिनी ऑलम्पिक; ७५ हजारांहून अधिक खेळाडूंचा सहभाग- खासदार डॉ....

ठाणे जिल्ह्यात रंगणार मिनी ऑलम्पिक; ७५ हजारांहून अधिक खेळाडूंचा सहभाग- खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ‘खासदार क्रीडासंग्राम सीझन २’चे आयोजन; ३१ खेळांचा समावेश

– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन तर केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या उपस्थितीत सांगता

– २० ते २९ नोव्हेंबरदरम्यान कल्याण, ठाणे आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघांत क्रीडामहोत्सवाचा थरार

– आंतरराष्ट्रीय खेळाडूंची उपस्थिती
– पारंपरिक खेळांसह आधुनिक खेळांनाही स्थान;३२ हून अधिक क्रीडा स्थळांवर स्पर्धांचे आयोजन

– Gen Z आणि युवा पिढीला मैदानाशी जोडत भविष्यातील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्याचा संकल्प

ठाणे | १७ नोव्हेंबर
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात राबविण्यात येणाऱ्या ‘सांसद खेल महोत्सव’अंतर्गत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून यंदा ‘खासदार क्रीडासंग्राम सीझन २’चे आयोजन करण्यात आले आहे. २० ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील कल्याण, ठाणे आणि भिवंडी या तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये हा भव्य क्रीडामहोत्सव रंगणार असून, यामध्ये ७५ हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहे. तब्बल ३१ विविध क्रीडाप्रकार आणि ३२ हुन अधिक अधिक क्रीडास्थळांवर आयोजित होणारा हा क्रीडामहोत्सव म्हणजे ठाणे जिल्ह्याचे एक प्रकारचे ‘मिनी ऑलिम्पिक’ ठरणार आहे. युवा पिढीला क्रीडाक्षेत्रात प्रोत्साहन देण्याच्या आणि स्थानिक पातळीवरील क्रीडा प्रतिभेला मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. तसेच यामध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना कशा पद्धतीने भविष्यात अधिक संधी देता येईल याबाबत देखील काम करणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

ठाण्यातील हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे खासदार क्रीडा संग्राम उपक्रमाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी बॅडमिंटन असोसिएशनचे श्रीकांत वाड यांच्यासह विविध खेळांच्या संघटनांचे अध्यक्ष पदाधिकारी देखील उपस्थित होते. डोंबिवली येथील संत सावळाराम महाराज क्रीडा संकुल येथे शुक्रवार २० नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे. तर देशाचे क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या मुख्य उपस्थितीत उपक्रमाची सांगता होणार आहे. तसेच यावेळी खेळाडूंना मार्गदर्शनासाठी आणि भेटीसाठी विविध क्रीडा प्रकारातील आंतरराष्ट्रीय खेळाडू देखील आवर्जून उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सांसद खेल महोत्सव’च्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी व्यापक उपक्रमाची संकल्पना मांडली आहे. याच संकल्पनेला अनुसरून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी खासदार क्रीडासंग्रामची सुरुवात केली होती. पहिल्या वर्षी खेळाडू आणि क्रीडाप्रेमींकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर यंदा या उपक्रमाची व्याप्ती अधिक मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे. यंदा केवळ कल्याण लोकसभा मतदारसंघापुरता हा उपक्रम मर्यादित न ठेवता ठाणे आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघांतील खेळाडूंनाही सहभागी करून घेण्यात आले आहे. खासदार नरेश म्हस्के, खासदार सुरेश म्हात्रे तसेच तिन्ही लोकसभा मतदारसंघांतील लोकप्रतिनिधी, स्थानिक पदाधिकारी आणि विविध क्रीडा संघटनांच्या सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार हेमंत पाटील, राजेश मोरे, बालाजी किणीकर, रवींद्र फाटक, उपनेते राहुल शेवाळे, प्रवक्त्या शितल म्हात्रे, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, ठाणे महापालिका महापौर शर्मिला पिंपळोलकर, कल्याण डोंबिवली महापालिका महापौर हर्षाली चौधरी, उल्हानसनगर महापालिका महापौर अश्विनी निकम, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, नगरसेवक रमाकांत मढवी, युवासेना जिल्हाध्यक्ष जितेन पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

३१ खेळांचा समावेश; पारंपरिक आणि आधुनिक क्रीडाप्रकारांचा अनोखा संगम

यंदाच्या खासदार क्रीडासंग्रामचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तब्बल ३१ विविध क्रीडाप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. पारंपरिक भारतीय खेळांचा वारसा जपतानाच आधुनिक आणि नव्या पिढीला आकर्षित करणाऱ्या खेळांनाही यामध्ये स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, आजच्या Gen Z आणि युवा पिढीच्या आवडीचे खेळ तसेच आपल्या पारंपरिक क्रीडा संस्कृतीतील खेळ यांचा सुंदर मिलाफ या क्रीडासंग्राममध्ये पाहायला मिळणार आहे. प्रत्येक खेळाला स्वतंत्र व्यासपीठ देण्यासोबतच विविध खेळांमध्ये प्रावीण्य मिळवू इच्छिणाऱ्या खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. लोकप्रिय खेळांपुरते मर्यादित न राहता तुलनेने कमी प्रसिद्धी मिळणाऱ्या खेळांनाही प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे.

*३२ क्रीडास्थळांवर होणार स्पर्धा*
या भव्य क्रीडामहोत्सवासाठी ठाणे जिल्ह्यातील विविध भागांमध्ये स्वतंत्र विभागीय केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. नवी मुंबई, दिवा, कळवा, डोंबिवली पूर्व आणि पश्चिम, कल्याण पूर्व आणि पश्चिम, कल्याण ग्रामीण, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर तसेच ठाणे शहरातील विविध विभागांचा यामध्ये समावेश आहे. सुमारे ३२ हून अधिक क्रीडास्थळांवर विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. यामुळे खेळाडूंना आपल्या परिसरातच स्पर्धेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध होणार आहे. प्रवासाचे अंतर आणि इतर अडचणींमुळे अनेकदा स्पर्धांपासून दूर राहणाऱ्या स्थानिक खेळाडूंनाही यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे.

ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम, बाबुराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर, सिंधुताई सपकाळ तिरंदाजी संकुल, शरदचंद्रजी पवार मिनी स्टेडियम, साकेत पोलीस मैदान, सचिन तेंडुलकर स्टेडियम आदी ठिकाणी स्पर्धा रंगणार आहेत. डोंबिवलीतील संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल, धर्मवीर आनंद दिघे सभागृह, डोंबिवली साऊथ इंडियन कॉलेज, नेहरू मैदान, रीजन्सी अनंतम परिसर, तर कल्याणमधील यशवंतराव चव्हाण क्रीडांगण आणि शहाड येथील सेंच्युरी रेयॉन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथेही विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय अंबरनाथमधील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान आणि शूटिंग रेंज, उल्हासनगर, भिवंडी, मुंब्रा, दिवा, कळवा आणि नवी मुंबईतील विविध क्रीडांगणांवरही स्पर्धा पार पडणार आहेत.

खेळाडूंच्या आरोग्याला प्राधान्य; प्रत्येक सहभागीला प्रमाणपत्र

या क्रीडामहोत्सवात खेळाडूंच्या सहभागाला आणि त्यांच्या आरोग्याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. प्रत्येक सहभागी खेळाडूला स्पर्धेतील सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार असून, विविध स्पर्धांच्या ठिकाणी खेळाडूंसाठी आवश्यक आरोग्य सुविधांची व्यवस्था करण्यात येणार आहे. मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी होणार असल्याने स्पर्धांचे नियोजन, खेळाडूंच्या सोयीसुविधा आणि आरोग्यविषयक बाबींवर विशेष लक्ष देण्यात येत आहे.

Gen Z ला मैदानाशी जोडण्याचा प्रयत्न; भविष्यातील खेळाडू घडविण्याचे ध्येय

आजच्या डिजिटल युगात तरुणाईला मोबाईल आणि सोशल मीडियाच्या विश्वातून प्रत्यक्ष मैदानाकडे आणणे, त्यांच्यामध्ये खेळाची आवड निर्माण करणे आणि त्यांच्या ऊर्जेला सकारात्मक दिशा देणे ही काळाची गरज आहे. खेळामुळे केवळ शारीरिक तंदुरुस्तीच नव्हे, तर शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि निर्णयक्षमताही विकसित होते. खासदार क्रीडासंग्रामच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक आणि नवोदित खेळाडूंना मोठ्या व्यासपीठावर आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धांमधून स्थानिक पातळीवरील गुणवंत खेळाडू समोर यावेत, त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन मिळावे आणि भविष्यात ठाणे जिल्ह्यातून राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू घडावेत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. प्रत्येक भागातील खेळाडूंना संधी मिळावी, प्रत्येक खेळाला प्रोत्साहन मिळावे आणि ठाणे जिल्ह्यातून भविष्यात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुणवंत खेळाडू घडावेत, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या क्रीडासंग्राममध्ये सहभागी होऊन आपल्या क्रीडाकौशल्याची चमक दाखवावी, असे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

खासदार क्रीडासंग्राममध्ये ३१ खेळांचा थरार!

कॅरम, मल्लखांब, खो-खो, कबड्डी, जलतरण, कुस्ती, बॅडमिंटन, रस्सीखेच, बॉक्सिंग, हँडबॉल, पिकल बॉल, लाठीकाठी, रग्बी, रिंग टेनिस, जिम्नॅस्टिक्स, तिरंदाजी, आट्यापाट्या, रायफल शूटिंग, अॅथलेटिक्स, फुटबॉल, बुद्धिबळ, टेबल टेनिस, तायक्वांदो, रोलर स्केटिंग, व्हॉलीबॉल, जुडो, बास्केटबॉल, लंगडी, पेटाँक, बॉडीबिल्डिंग आणि बॉक्स क्रिकेट.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा