
मंत्री आशिष शेलार, पोलीस महासंचालक सदानंद दाते,पद्मश्री पं. सुरेश तळवलकर प्रमूख अतिथी
पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसियांचा शताब्दी पुरस्काराने होणार गौरव
कल्याण | ३ जुलै :
शास्त्रीय संगीताचा प्रचार, प्रसार आणि संवर्धन हे ध्येय समोर ठेवून गेल्या शतकभरापासून अविरत कार्य करणाऱ्या कल्याण गायन समाजाने आपल्या सांस्कृतिक प्रवासातील ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. १० जुलै २०२५ रोजी संस्थेला १०० वर्षे पूर्ण होत असून, या शताब्दी वर्षानिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा शताब्दी वर्ष सोहळा रविवार, १२ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण (पश्चिम) येथे संपन्न होणार आहे. (A Century of Musical Legacy: Kalyan Gayan Samaj Announces Grand Centenary Celebration with Eminent Dignitaries)
गेल्या शंभर वर्षांत कल्याण गायन समाजाने शास्त्रीय संगीताची परंपरा जपताना अनेक दिग्गज कलाकार घडविण्याचे आणि रसिकांना दर्जेदार संगीताची मेजवानी देण्याचे कार्य केले आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात या संस्थेने आपला स्वतंत्र ठसा उमटविला असून, शताब्दी वर्षाचा हा सोहळा संस्थेच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारा ठरणार आहे.
या विशेष सोहळ्यास महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते, शताब्दी पुरस्काराचे मानकरी पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया आणि तबलावादक पद्मश्री पं. सुरेश तळवलकर यांचीही विशेष उपस्थिती कार्यक्रमाचे आकर्षण ठरणार आहे. तर ज्ञाना ‘झालासी पावन’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रमही या सोहळ्याचे विशेष आकर्षण असणार आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा…
* “ज्ञाना झालासी पावन” विशेष कार्यक्रम
* पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया यांचा शताब्दी पुरस्काराने गौरव
* संगीतमार्तंड पं. जसराज यांच्या तैलचित्राचे अनावरण
* कल्याण गायन समाजाच्या १०० वर्षांच्या इतिहासावरील स्मरणिकेचे प्रकाशन
* संस्थेच्या गौरवशाली प्रवासावर आधारित ‘स्वरहोत्र’ ध्वनिचित्रफितीचे अनावरण
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संदीप जाधव आणि शताब्दी समितीचे अध्यक्ष सीताराम कुंटे (भाप्रसे, निवृत्त) यांनी संगीतप्रेमी, रसिक नागरिक आणि कल्याणकरांना या ऐतिहासिक सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
शास्त्रीय संगीताच्या अखंड परंपरेचा शतकभराचा प्रवास साजरा करणारा हा सोहळा कल्याणच्या सांस्कृतिक इतिहासातील अविस्मरणीय पर्व ठरणार आहे.

























