Home ठळक बातम्या दिप अमावस्येनिमित्त परंपरेच्या ज्योतीने उजळले बालक मंदिर; ६५० विद्यार्थ्यांनी जपला भारतीय संस्कृतीचा...

दिप अमावस्येनिमित्त परंपरेच्या ज्योतीने उजळले बालक मंदिर; ६५० विद्यार्थ्यांनी जपला भारतीय संस्कृतीचा वारसा

कल्याण | १२ ऑगस्ट
भारतीय संस्कृतीमध्ये दिप केवळ प्रकाशाचे साधन मानले जात नाही, तर तो ज्ञान, संस्कार, सकारात्मकता आणि अज्ञानाच्या अंधकारावर विजयाचे प्रतीक मानला जातो. याच समृद्ध सांस्कृतिक परंपरेची ओळख नव्या पिढीला व्हावी आणि आपल्या पूर्वजांनी जपलेल्या संस्कारांचा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, या भावनेतून बालक मंदिर संस्थेच्या प्राथमिक – पूर्व प्राथमिक शाळेत दिप अमावस्येनिमित्त दरवर्षीप्रमाणे भव्य दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. (Balak Mandir Shines Bright with Tradition on Deep Amavasya; 650 Students Celebrate India’s Rich Cultural Heritage)

बालक मंदिर प्राथमिक शाळेच्या नूतन वास्तूमध्ये झालेल्या या दिपोत्सवात तब्बल ६५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी आपल्या घरून विविध आकारांचे, रंगीबेरंगी आणि आकर्षक दिवे आणून त्यांची सुंदर मांडणी केली. यावेळी प्रज्वलित झालेल्या असंख्य दिपज्योतींनी शाळेचा परिसर उजळून निघाला होता.

या कार्यक्रमाचे उद्घाटन कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्रमांक ७ (ब)चे नगरसेवक शामल गायकर आणि बालक मंदिर संस्थेचे पदाधिकारी रमेश गोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी भारतीय संस्कृतीतील दीपाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. दिव्याच्या प्रकाशाप्रमाणे प्रत्येकाच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पसरावा, अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि कुटुंबात सुख-शांती नांदावी, अशी मंगलकामनाही करण्यात आली.

आजच्या आधुनिक आणि वेगवान जीवनशैलीत आपल्या पारंपरिक सण-उत्सवांचे महत्त्व आणि त्यामागील संस्कारमूल्ये पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज अधिक अधोरेखित होते. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या सहभागातून आयोजित करण्यात आलेला हा दिपोत्सव केवळ दिव्यांची सजावट न राहता भारतीय संस्कृतीशी नव्या पिढीचे नाते दृढ करणारा संस्कारमय उपक्रम ठरला.

विद्यार्थ्यांनी साकारलेल्या दिपसजावटीचे दर्शन घेण्यासाठी पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि त्यांच्या कल्पकतेला पालकांनीही मनापासून दाद दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कामिनी पाटील यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय व स्वागत मीनाक्षी सरोद यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन पालक-शिक्षक संघाचे सचिव शशिकांत गवारे यांनी केले. कार्यक्रमाचे फेसबुकवर थेट प्रक्षेपण जितेंद्रसिंग निकुंभ यांनी केले, तर मंडप व्यवस्थेची जबाबदारी मंगेश घाटे यांनी सांभाळली. अलका जडे यांनी आभार मानले. या वेळी पूर्वप्राथमिक शाळेच्या निमंत्रित सदस्या वृषाली जोशी आणि प्राथमिक शाळेचे निमंत्रित सदस्य राजेंद्र फडके उपस्थित होते. संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही उत्साहाने सहभागी होत कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रमाला प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पनाताई पवार, पूर्वप्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अनुजाताई पेठे, तसेच ज्येष्ठ शिक्षिका प्रतिभा मोरे, विद्या घुले आणि गौरी रानडे यांचे मार्गदर्शन लाभले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा