Home ठळक बातम्या जनगणना २०२७ प्रक्रिया; घरी येणाऱ्या प्रगणकांना आवश्यक माहिती देण्याचे केडीएमसी आयुक्तांचे आवाहन

जनगणना २०२७ प्रक्रिया; घरी येणाऱ्या प्रगणकांना आवश्यक माहिती देण्याचे केडीएमसी आयुक्तांचे आवाहन

कल्याण दि.29 एप्रिल :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून जनगणना २०२७ संदर्भात महत्त्वाची माहिती जाहीर करण्यात आली आहे. जनगणना अधिनियम १९४८ व जनगणना नियम १९९० अंतर्गत भारताची जनगणना प्रक्रिया सुरू करण्यात येत असून ही प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडणार आहे. (Census 2027 Process: KDMC Commissioner Urges Citizens to Provide Required Information to Visiting Enumerators)

पहिल्या टप्प्यात घरांची यादी तयार करणे आणि घरगणना केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्यात हा टप्पा १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्या गणना ९ फेब्रुवारी २०२७ ते २८ फेब्रुवारी २०२७ दरम्यान होणार आहे.

विशेष म्हणजे, नागरिकांना ‘स्व-गणना’ (Self Enumeration – SE) करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे [https://se.census.gov.in](https://se.census.gov.in) या अधिकृत पोर्टलद्वारे नागरिक स्वतःची माहिती नोंदवू शकतात. ही सुविधा ०१ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत खुली राहणार आहे.

त्यानंतर 16मे ते 14 जून दरम्यान होणाऱ्या घरगणना प्रक्रियेदरम्यान प्रगणक नियुक्त क्षेत्रात प्रत्यक्ष भेट देऊन माहिती संकलित करतील. यावेळी शासनाने निश्चित केलेल्या ३३ प्रश्नांची उत्तरे घरातील प्रमुख किंवा उपलब्ध व्यक्तीकडून घेतली जातील. ही सर्व माहिती HLO ॲपद्वारे ऑनलाइन अपलोड केली जाणार असून संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पार पडणार आहे. नागरिकांच्या गोपनीयतेची पूर्ण काळजी घेतली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नागरिकांनी प्रगणक – पर्यवेक्षक यांना आवश्यक माहिती देऊन या राष्ट्रीय उपक्रमात सहकार्य करावे, असे आवाहन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रमुख जनगणना अधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा