Home ठळक बातम्या केडीएमसीच्या सात प्रभागांतील स्वच्छता कर्मचाऱ्यांनाही सुमीत एलकोप्लास्टचा दिवाळी बोनस; २१ हजारांपेक्षा अधिक...

केडीएमसीच्या सात प्रभागांतील स्वच्छता कर्मचाऱ्यांनाही सुमीत एलकोप्लास्टचा दिवाळी बोनस; २१ हजारांपेक्षा अधिक वेतनधारकांनाही लाभ

कर्मचाऱ्यांच्या सेवाकाल आणि रुजू होण्याच्या तारखेनुसार बोनसची रक्कम जमा

कल्याण | ५ नोव्हेंबर
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (केडीएमसी) सात प्रभागांमध्ये घनकचरा व्यवस्थापन आणि संकलनाचे काम करणाऱ्या सुमीत एलकोप्लास्ट कल्याण एसएमडब्ल्यू प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने आपल्या पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वार्षिक बोनस वितरित केला आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ साठीचा हा बोनस ४ नोव्हेंबर २०२६ रोजी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आल्याची माहिती कंपनी व्यवस्थापनाने दिली आहे. (Diwali Bonus for Sanitation Workers Across 7 KDMC Wards by Sumit Elkoplast; Employees Earning Above ₹21,000 Also Included)

शहरातील स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मेहनतीची आणि योगदानाची दखल घेत कंपनीने हा निर्णय घेतला आहे. कल्याण-डोंबिवलीतील प्रकल्प टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आल्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याच्या रुजू होण्याच्या तारखेनुसार आणि सेवाकालावधीनुसार बोनसचे वितरण करण्यात आले आहे.

या बोनस वितरणाचे वैशिष्ट्य म्हणजे, केवळ २१ हजार रुपयांपर्यंत वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांपुरतेच हे लाभ मर्यादित न ठेवता, त्यापेक्षा अधिक वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांनाही बोनस देण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. त्यामुळे कंपनीच्या विविध विभागांत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

सुमित एल्कोप्लास्ट कंपनी व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, बोनसचे वितरण बोनस देयक अधिनियम १९६५, वेतन संहिता २०१९ मधील लागू तरतुदी तसेच कंपनीचे मंजूर धोरण आणि पात्रता निकष विचारात घेऊन करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांनी आपल्या वेतन नोंदी तपासून बोनस जमा झाल्याची खात्री करावी. यासंदर्भात कोणतीही तफावत किंवा शंका असल्यास मानव संसाधन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कल्याण-डोंबिवली शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या मेहनतीचा सन्मान करण्यासोबतच कर्मचारी कल्याणाला प्राधान्य देणे आणि त्यांच्या कामाची योग्य दखल घेणे ही कंपनीची भूमिका असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.

कंपनीची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कर्मचारी सातत्याने दाखवत असलेली मेहनत, समर्पण आणि व्यावसायिकता याबद्दल व्यवस्थापनाने सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.
सुमीत एलकोप्लास्ट कल्याण एसएमडब्ल्यू प्रायव्हेट लिमिटेड व्यवस्थापनाच्या या निर्णयामुळे शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला आहे.

दरम्यान सुमित एल्कोप्लास्टमध्ये असेही काही कर्मचारी आहेत, जे आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये सुमित एल्कोप्लास्टमध्ये लागण्यापूर्वी इतर कंपन्यांमध्ये कार्यरत होते. अशा कर्मचाऱ्यांनी आपल्या दिवाळी बोनससाठी आपल्या जुन्या कंपनीशी संपर्क साधावा. या आर्थिक वर्षात सुमित एल्कोप्लास्टमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनीकडून बोनस देण्यात आल्याचेही कंपनी व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा