
खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
भुयारी आणि उन्नत मार्ग असे दुहेरी पद्धतीने होणार उभारणी
कल्याण | ४ नोव्हेंबर
कल्याण, भिवंडी, उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरातील नागरिकांसाठी यंदाच्या दिवाळीत मेट्रोच्या रूपाने विकासाची मोठी भेट मिळाली आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गिका ५ च्या पुढील टप्प्यांसह मेट्रो मार्गिका ५ अ च्या उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) वतीने ४ हजार ५६४ कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाच्या पुढील कामांना गती मिळणार असून, कल्याण आणि उल्हासनगरसह अंबरनाथ परिसरातील नागरिकांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे या मेट्रो मार्गिकांच्या उभारणीसाठी सातत्याने आग्रही होते. यासाठी वेळोवेळी त्यांनी एमएमआरडीए मुख्यालयात बैठका देखील घेतल्या होत्या. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून या मेट्रो मार्गिकांच्या उभारणीला गती मिळाली आहे. (Diwali Gift of Metro Connectivity for Kalyan and Ulhasnagar; Tenders Invited for Next Phases of Metro Lines 5 & 5A)
कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे नागरीकरण लक्षात घेता या भागात सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे सातत्याने प्रयत्नशील आहेत. मेट्रो मार्गिका ५ आणि तिच्या विस्तारित टप्प्यांसंदर्भात त्यांनी शासन तसेच एमएमआरडीएच्या स्तरावर वारंवार बैठका घेऊन पाठपुरावा केला आहे. या प्रयत्नांमुळे आता मेट्रो ५ च्या पुढील टप्प्यांसह मेट्रो ५ अ च्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली असून, कल्याण-उल्हासनगर-अंबरनाथ परिसराच्या वाहतूक व्यवस्थेत मोठे परिवर्तन घडविण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. मेट्रो मार्गिका ५ चा विस्तार कल्याण आणि उल्हासनगरपर्यंत व्हावा, यासाठी त्यांनी शासन तसेच एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत वारंवार बैठका घेतल्या. प्रकल्पाच्या मार्गरेखेत आवश्यक सुधारणा करणे, विविध प्रशासकीय मान्यता मिळविणे आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील अडथळे दूर करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे सुधारित मार्गरेखेला राज्य शासनाची मान्यता मिळाली. त्यानंतर आता एमएमआरडीएकडून पुढील टप्प्यांच्या प्रत्यक्ष बांधकामासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गिका ५ च्या पहिल्या टप्प्यात कापूरबावडी ते धामणकर नाका या मार्गिकेचे काम सुरू आहे. या पुढील विस्तारामध्ये धामणकर नाका ते रांजणोली, यानंतर रांजणोली ते भोईरवाडी (व्हाया दुर्गाडी मार्गे) असा टप्पा असणार आहे. यामध्ये भिवंडी मधील अरुंद आणि गर्दीचे रस्ते पाहता धामणकर नाका ते टेमघर इतका मार्ग भुयारी पद्धतीने उभारला जाणार आहे तर उर्वरित उन्नत मार्ग असेल. तर ५ अ मध्ये भोईरवाडी ते कल्याण स्थानक आणि भोईरवाडी ते उल्हासनगर ( अंबरनाथ जिएनपी गॅलेक्सि ) अशा पद्धतीने मेट्रो ५ आणि त्याचा विस्तारित भागाची उभारणी करण्यात येणार आहे. यामुळे थेट ठाण्याहून निघालेल्या प्रवाशाला कल्याण, उल्हासनगर येथे पोहचता येणार आहे. तर या विस्तारित मार्गिकांच्या उभारणीत आधुनिक वाहतूक नियोजनाचा विचार करण्यात आला आहे. रांजणोली जंक्शन ते दुर्गाडी या परिसरात मेट्रो मार्गिकेसोबत उड्डाणपुलाची एकत्रित रचना असलेला डबल डेकर मार्ग उभारण्याचे नियोजन आहे. त्यामुळे भविष्यातील वाढत्या वाहतुकीचा विचार करून रस्ते आणि मेट्रो या दोन्ही सुविधांचा एकाच मार्गिकेतून विकास करणे शक्य होणार आहे. भिवंडीतील धामणकर नाका परिसरापासून पुढे दुर्गाडी, खडकपाडा, भोईरवाडी आणि कल्याण स्थानकापर्यंत मेट्रोचे जाळे विस्तारल्याने या शहरांमधील परस्पर संपर्क अधिक सुलभ होणार आहे. तसेच उल्हासनगरकडे जाणाऱ्या स्वतंत्र मेट्रो मार्गामुळे या भागातील नागरिकांनाही जलद सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होईल.
सध्या भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरातील नागरिकांना कामानिमित्त ठाणे, मुंबई तसेच इतर शहरांमध्ये प्रवास करताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. विशेषतः कल्याणमधील दुर्गाडी, खडकपाडा, भोईरवाडी तसेच उल्हासनगर परिसरातील रस्त्यांवरील वाढता वाहनांचा भार पाहता मेट्रोची ही विस्तारित मार्गिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मेट्रो सुरू झाल्यानंतर रस्त्यांवरील खासगी वाहनांचा भार कमी होण्यास मदत होईल. नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ होईल. त्याचबरोबर मध्य रेल्वे, मेट्रो मार्गिका ४ आणि प्रस्तावित मेट्रो मार्गिका १२ यांच्याशी जोडणी अधिक सक्षम होऊन संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातील दळणवळण व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. मेट्रोच्या माध्यमातून या परिसरातील औद्योगिक, व्यावसायिक आणि निवासी क्षेत्रांनाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना आधुनिक, जलद आणि सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला या निविदा प्रसिद्धीमुळे महत्त्वाचे यश मिळाले आहे. ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथ या शहरांना मेट्रोच्या माध्यमातून एकमेकांशी जोडण्याचा हा प्रकल्प भविष्यात संपूर्ण परिसराच्या विकासाचा महत्त्वाचा आधार ठरणार आहे.
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गिका ५ च्या पहिल्या टप्प्यात कापूरबावडी ते धामणकर नाका या मार्गिकेचे काम सुरू आहे. या पुढील विस्तारामध्ये धामणकर नाका ते रांजणोली, यानंतर रांजणोली ते भोईरवाडी (व्हाया दुर्गाडी) मार्गे असा टप्पा असणार आहे. यामध्ये भिवंडी मधील अरुंद आणि गर्दीचे रस्ते पाहता धामणकर नाका ते टेमघर इतका मार्ग भुयारी पद्धतीने उभारला जाणार आहे तर उर्वरित उन्नत मार्ग असेल. तर ५ अ मध्ये भोईरवाडी ते कल्याण स्थानक आणि भोईरवाडी ते उल्हासनगर ( अंबरनाथ जिएनपी गॅलेक्सि ) अशा पद्धतीने मेट्रो ५ आणि त्याचा विस्तारित भागाची उभारणी करण्यात येणार आहे.
यासाठी एकूण ४ हजार ५६४ कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
डबल डेकर मार्गिकांचे स्वतंत्र जाळे…
भिवंडीहून येणारी मेट्रो ५ ची डबल डेकर मार्गिका कोनगावपर्यंत येणार असून, कोनगाव येथून या मार्गिकेचा एक फाटा कल्याण एपीएमसीच्या दिशेने जाणार आहे. तर कोनगावपासून मेट्रो मार्गिका ५ चा विस्तार भोईरवाडीपर्यंत करण्यात येणार आहे. भोईरवाडी येथून पुढे मेट्रो मार्गिका उल्हासनगरच्या प्रवेशद्वारापर्यंत, म्हणजे सध्या उन्नत रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणापर्यंत जाणार आहे. त्यानंतर जगदीश दूध डेपो परिसरापासून उल्हासनगरपर्यंत डबल डेकर मार्गिकेची उभारणी करण्यात येणार आहे. अशा प्रकारे भिवंडी, कल्याण, भोईरवाडी आणि उल्हासनगर या परिसरांना मेट्रो तसेच डबल डेकर मार्गिकांच्या माध्यमातून जोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे मेट्रो आणि रस्ते वाहतुकीसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध होऊन या संपूर्ण परिसरातील दळणवळण अधिक सक्षम होणार आहे.























