Home ठळक बातम्या डोंबिवलीतील डॉक्टर मारहाणप्रकरणी सोमवारी आयएमएने पुकारला राज्यस्तरीय बंद ;कल्याणातील डॉक्टरांच्या सर्व संघटना...

डोंबिवलीतील डॉक्टर मारहाणप्रकरणी सोमवारी आयएमएने पुकारला राज्यस्तरीय बंद ;कल्याणातील डॉक्टरांच्या सर्व संघटना पूर्णपणे सहभागी होणार

कल्याण | १८ जुलै :
डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात झालेल्या डॉक्टर मारहाणप्रकरणी महाराष्ट्र आयएमएने आक्रमक भूमिका घेत येत्या सोमवारी २४ तासांच्या राज्यस्तरीय बंदची हाक दिली आहे. महाराष्ट्र आयएमएच्या या बंदमध्ये कल्याण डोंबिवलीतील डॉक्टरांच्या सर्व संघटना पूर्णपणे सहभागी होणार असल्याची माहिती इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याणचे अध्यक्ष डॉ राजेश राघव राजू यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच यानंतरही शासनाकडून कोणतीही कडक कायदेशीर कारवाई न झाल्यास पुढील महिन्यापासून बेमुदत बंदचा इशाराही डॉक्टरांच्या संघटनेकडून यावेळी देण्यात आला आहे. (Dombivli Doctor Assault Sparks Statewide IMA Shutdown on Monday; Kalyan’s Medical Fraternity Extends Full Support)

डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात ६ जुलै रोजी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांकडून डॉक्टरांना मारहाण करण्याची घटना घडली होती. ज्याचे कल्याण डोंबिवलीसह संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले. तर प्रशासनाकडून या घटनेनंतर संबंधितांविरुद्ध झालेली कायदेशीर कारवाई असमाधानकारक असल्याचे सांगत महाराष्ट्र इंडियन मेडीकल असोसिएशनतर्फे येत्या सोमवारी 20 जुलै 2026 रोजी बंदची हाक दिली आहे. तसेच डॉक्टरांवरील हल्ल्याबाबत शासनाने तयार केलेला कायदा अधिक कडक करणे, डॉक्टरांना काम करण्यासाठी सुरक्षित वातावरण तयार करणे, रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास न होण्यासाठी एस ओ पी तयार करणे, भविष्यातील अशा घटना टाळण्यासाठी शासनाकडून एक समुपदेशन समिती तयार करणे आदी आमच्या मागण्या असल्याचे डॉ. राजेश राघव राजू यांनी यावेळी दिली.

या पत्रकार परिषदेला निमा संघटनेचे शाम पोटदुखे, आयुर्वेद व्यासपीठचे वैद्य अभिजीत ठाकूर, कल्याण होमिओपॅथिक डॉक्टर संघटनेचे डॉ. राहुल काळे, केंपस्वा सुभाष कदम, इंडियन डेंटल असोसिएशनचे डॉ. किरण टोकेकर यांच्यासह डॉ. हिमांशु ठक्कर, डॉ. दिपक पोगाडे हेदेखील उपस्थित होते.

दरम्यान या 24 तासांच्या बंदमध्ये राज्यातील आपत्कालीन सुविधा सुरू राहतील मात्र सर्व डॉक्टर आपली ओपीडी बंद राहणार असल्याचेही यावेळी डॉक्टर संघटनांकडून स्पष्ट करण्यात आले. तर यानंतरही कडक कायदेशीर कारवाई न झाल्यास पुढील महिन्याच्या 9 ऑगस्टपासून बेमुदत बंद करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा