Home ठळक बातम्या डम्पिंग ग्राउंडच्या कचरावेचक कुटुंबातील तरुण बनला वकील; संघर्ष, जिद्द आणि शिक्षणाची प्रेरणादायी...

डम्पिंग ग्राउंडच्या कचरावेचक कुटुंबातील तरुण बनला वकील; संघर्ष, जिद्द आणि शिक्षणाची प्रेरणादायी यशोगाथा

ॲड. रवी चक्रधर घुलेची गगन भरारी

कल्याण | २३ जून :
कल्याण डम्पिंग ग्राऊंडलगत वसलेल्या साठेनगर वस्तीत अनेक कुटुंबांचे आयुष्य कचऱ्याभोवतीच फिरते. सकाळ उगवते ती कचऱ्याच्या ढिगाऱ्यात, दिवस जातो तो कचरा वेचण्यात आणि उद्याची आशादेखील त्याच कचऱ्यात हरवून जाते. अशी परिस्थिती असलेल्या या वस्तीतील रवी घुले या तरुणाने कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून स्वतःचे वेगळे भविष्य निर्माण केले आणि आज तो वकील बनून न्यायाच्या व्यासपीठावर उभा राहण्यास सज्ज झाला आहे. आज रवीच्या नावापुढे “ॲडव्होकेट” ही पदवी अभिमानाने जोडली गेली आहे. पण या यशोगाथेमागे अनुबंध संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्यांची भक्कम साथ आणि रवीची अथक जिद्द दडलेली आहे. (From a Dumping Ground to the Courtroom: Young Man from a Waste-Picker Family Becomes a Lawyer, Inspiring Thousands with His Journey of Grit and Education)

अनुबंध संस्थेने २ दशकांपूर्वी रोवली मुहूर्तमेढ…
सुमारे २०-२२ वर्षांपूर्वीची गोष्ट. अनुबंध या सामाजिक संस्थेने डम्पिंग ग्राऊंडलगतच्या साठेनगर वस्तीतील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार केला. दारिद्र्य, उपासमार, असुरक्षितता आणि शिक्षणापासून वंचित राहिलेल्या पिढ्या… कचरा वेचक कुटुंबातील मुलांनी शाळेचे दारही पाहिले नव्हते, अशा कठीण परिस्थितीत त्यांच्यामध्ये शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करण्याचे काम अनुबंधच्या टीमने सुरू केले.

आज १३-१४ मुलं मुली महाविद्यालयीन शिक्षणाच्या प्रवाहात…
अनुबंध संस्थेच्या या उपक्रमात सहभागी झालेल्या सुरुवातीच्या मोजक्या मुलांपैकी एक विद्यार्थी रवी घुले. हा केवळ त्या वस्तीतीलच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबियातील पहिला मुलगा ठरला, ज्याने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. दहावीच्या परीक्षेत त्याने चांगले गुण मिळवले आणि त्याच्या माध्यमातून वस्तीतील अनेकांच्या मनामध्ये अनुबंध संस्थेने मुख्य प्रवाहातील स्वप्नांची पेरणी केली. परिणामी शिक्षणाचे महत्त्व जाणून घेत रवी पाठोपाठ कचरावेचक कुटुंबातील प्रभाकर घुले, राहुल साबळे, दशरथ साबळे या मुलांसह काही मुलीही आज महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत पोहोचल्या आहेत. अनुबंध संस्थेने उभारलेल्या शिक्षणाच्या पायावर इथली जवळपास १३-१४ मुलं मुली आपापली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक मेहनत घेत आहेत. ज्यासाठी अनुबंध संस्थेसोबतच कल्याणातील अग्रगण्य के. एम. अग्रवाल महाविद्यालयानेही सामाजिक बांधिलकी जपत या मुलांच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

रवीच्या अर्धांगिनीचीही वकीलपदाच्या दिशेने वाटचाल…
कालपर्यंत ज्याच्या हातात कचऱ्यातून उपजीविकेचे साधन शोधण्याची वेळ होती, त्याच कुटुंबातील पुढच्या पिढीच्या हातात आज कायद्याचे पुस्तक आणि न्यायासाठी लढण्याची ताकद आहे. रवीसोबतच त्याची पत्नी सबुरी हीदेखील कायद्याचे शिक्षण घेत असून वकील बनण्याच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे. रवी घुलेचा हा प्रवास साठेनगरमधील असंख्य मुलांसाठी आशेचा किरण ठरला आहे. “आपलं भविष्यही बदलू शकतं” हा विश्वास त्याने आपल्या यशातून निर्माण केला आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षण, जिद्द आणि योग्य मार्गदर्शन मिळालं तर स्वप्नांनाही पंख फुटतात हाच संदेश त्याच्या यशोगाथेतून मिळत आहे.

याचे श्रेय रवी घुले आणि त्याच्या कुटुंबाइतकेच अनुबंध संस्थेच्या प्रा. मीनल सोहनी, विशाल जाधव, सूर्यकांत कोळी, विशाल कुंटे, विजया सोनावणे, ॲड. मिनाक्षी पाटील यांच्यासह संपूर्ण टीमला जाते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा