
२५ फुल मॅरेथॉन पूर्ण करण्याचा टप्पा पार; न्यूयॉर्कच्या ‘परेड ऑफ नेशन्स’मध्ये पारंपरिक भारतीय वेशभूषेत केले भारताचे प्रतिनिधित्व; जागतिक स्तरावर उंचावला कल्याणचा मान
कल्याण | १४ नोव्हेंबर
स्वप्न पाहण्यासाठी वयाचे बंधन नसते आणि ते पूर्ण करण्यासाठी जिद्द, सातत्य व कठोर परिश्रमांची साथ पुरेशी असते, हे कल्याणचे ज्येष्ठ धावपटू दिलीप श्रीरंग घाडगे यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. वयाच्या ४७व्या वर्षी धावण्यास सुरुवात करणाऱ्या घाडगे यांनी आजवर २५ पूर्ण मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण करत जागतिक क्रीडा क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. १ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रतिष्ठित न्यूयॉर्क सिटी मॅरेथॉन पूर्ण करून त्यांनी ‘ॲबॉट वर्ल्ड मॅरेथॉन मेजर्स सिक्स स्टार’ हे मानाचे पदक प्राप्त केले. त्यांच्या या कामगिरीमुळे कल्याणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. (He Started Running at 47… Today, Kalyan’s Dilip Ghadge is Making His Mark on the Global Marathon Stage! A Remarkable Journey of Determination and Perseverance.)
कल्याण ते न्यूयॉर्क…जिद्दीचा जागतिक प्रवास
दिलीप घाडगे यांच्या धावण्याच्या प्रवासाची सुरुवात २०१४ मध्ये झाली. वयाच्या ४७व्या वर्षी त्यांनी धावण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला छंद म्हणून सुरू झालेल्या या प्रवासाचे रूपांतर पुढे एका महत्त्वाकांक्षी क्रीडा ध्येयात झाले. २०१९ मध्ये टाटा मुंबई मॅरेथॉन पूर्ण करत त्यांनी पहिली फुल मॅरेथॉन यशस्वी केली आणि त्यानंतर जागतिक स्तरावरील मॅरेथॉन स्पर्धांकडे वाटचाल सुरू केली.
२०२३ मध्ये बर्लिन मॅरेथॉन ४ तास १० मिनिटांत पूर्ण करत त्यांनी पहिली वर्ल्ड मॅरेथॉन मेजर गाठली. त्यानंतर २०२४ मध्ये लंडन आणि शिकागो, २०२५ मध्ये टोकियो, बोस्टन आणि सिडनी, तर २०२६ मध्ये केपटाऊन आणि न्यूयॉर्क अशा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत त्यांनी आपली कामगिरी सातत्याने उंचावली.
न्यूयॉर्क सिटी मॅरेथॉन पूर्ण करणे हा त्यांच्या या प्रवासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरला. यासह त्यांनी प्रतिष्ठेचे सिक्स स्टार पदक मिळवण्याचे स्वप्न पूर्ण केले. सिडनी आणि केपटाऊनमधील सहभागासह त्यांच्या नावावर एकूण आठ वर्ल्ड मॅरेथॉन मेजर्स स्टार्स जमा झाल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. विशेष म्हणजे असा बहुमान मिळवलेले अख्ख्या भारतभरात दिलीप घाडगे यांच्यासह केवळ २८ धावपटू आजमितीस आहेत.
‘परेड ऑफ नेशन्स’मध्ये भारतीय संस्कृतीचा अभिमान…
न्यूयॉर्क मॅरेथॉनच्या मुख्य स्पर्धेपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या ‘परेड ऑफ नेशन्स’ या उद्घाटन सोहळ्यात दिलीप घाडगे यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. पारंपरिक भारतीय वेशभूषेत जगभरातील धावपटूंसोबत या परेडमध्ये सहभागी होत त्यांनी भारतीय संस्कृतीची ओळख जागतिक व्यासपीठावर अभिमानाने सादर केली. जगाच्या विविध देशांतून आलेल्या धावपटूंच्या उपस्थितीत भारतीय परंपरेचे प्रतिनिधित्व करण्याचा हा अनुभव त्यांच्या मॅरेथॉन प्रवासातील आणखी एक अविस्मरणीय क्षण ठरला.
वय वाढले, पण धावण्याचा वेगही वाढत गेला…
विशेष म्हणजे, घाडगे यांची कामगिरी केवळ सहभागापुरती मर्यादित राहिलेली नाही. प्रत्येक स्पर्धेत स्वतःच्या क्षमतेत सुधारणा करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरूच राहिला. फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या नवी दिल्ली मॅरेथॉनमध्ये त्यांनी ३ तास ४० मिनिटांची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवली. त्यांच्या कारकिर्दीतील सलग आठ स्पर्धांच्या एका टप्प्यात सात वेळा वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवणे, हे त्यांच्या सातत्यपूर्ण सरावाचे आणि शिस्तबद्ध प्रशिक्षणाचे द्योतक आहे.
मॅरेथॉनच्या पलीकडेही साहसी आणि सामाजिक प्रवास…
दिलीप घाडगे यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान केवळ मॅरेथॉनपुरते मर्यादित नाही. २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील आव्हानात्मक ‘कॉम्रेड्स मॅरेथॉन’ आणि २०२४ मध्ये तब्बल १०० किलोमीटरची ‘बॉर्डर अल्ट्रा’ पूर्ण करत त्यांनी आपली सहनशक्ती सिद्ध केली आहे.
सायकलिंग क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून, २०२० मध्ये ‘सुपर रँडोनर’ हा किताब पटकावला. विशेष म्हणजे, त्यांच्या साहसी मोहिमांना सामाजिक बांधिलकीचीही जोड आहे. रोटरी दिव्यांग सेंटरसाठी त्यांनी कल्याण ते गोवा अशी सुमारे ६०० किलोमीटरची सायकल मोहीम पूर्ण केली. तर ग्रामीण भागातील शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने सुमारे १२०० किलोमीटरची आणखी एक सायकल मोहीम राबवली.
कल्याणमध्ये धावण्याची संस्कृती रुजविण्यातही योगदान…
स्वतः जागतिक स्तरावर यश मिळवतानाच आपल्या शहरातही धावण्याची संस्कृती विकसित व्हावी, यासाठी घाडगे यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. ‘के फिट’ आणि ‘बोरगावकर रोटरी कल्याण मॅरेथॉन’ या उपक्रमांच्या उभारणीत त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे. बोरगावकर रोटरी कल्याण मॅरेथॉनच्या सुरुवातीपासून त्यांनी पाच वेळा रेस डायरेक्टर म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या या योगदानातून कल्याणमध्ये नवोदित धावपटूंना व्यासपीठ मिळवून देण्यास आणि शहरात आरोग्य व फिटनेसविषयी जागरूकता निर्माण करण्यास मदत झाली आहे. या मॅरेथॉनला सलग तीन वर्षे मुंबई रोड रनर्स (MRR) रेस रेटिंगमध्ये सर्वोच्च मानांकन मिळाले आहे.
यशामागे प्रशिक्षक, कुटुंबीय आणि सहकाऱ्यांची साथ…
आपल्या या यशाचे श्रेय देताना दिलीप घाडगे म्हणतात, “या संपूर्ण प्रवासात अनेकांचे मोलाचे योगदान आहे. माझे पहिले प्रशिक्षक समीर पाटील यांनी माझ्या धावण्याचा पाया घातला. सतीश गुजारन यांनी पहिली कॉम्रेड्स मॅरेथॉन पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन केले. अमेरिकन कॉलेज ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनशी संबंधित मॅरेथॉन कोचिंगचे शिक्षण आणि जॅक डॅनियल्स यांच्यासह अनेक लेखकांची धावण्यावरील पुस्तके यांमुळे प्रशिक्षणाकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहायला शिकलो. माझे प्रशिक्षक, धावण्याचे व प्रवासाचे सोबती आणि कुटुंबीय यांचा मी मनापासून ऋणी आहे.”
‘सुरुवात करण्यासाठी वय कधीच अडथळा नाही…
आपल्या अनुभवातून नव्या पिढीला आणि विशेषतः चाळिशीनंतर स्वतःसाठी नवे ध्येय निश्चित करू इच्छिणाऱ्यांना संदेश देताना घाडगे सांगतात, “मी जेव्हा धावायला सुरुवात केली, तेव्हा माझे वय ४७ वर्षांपेक्षा अधिक होते. त्यामुळे कोणतीही गोष्ट सुरू करण्यासाठी किंवा स्वतःमध्ये सुधारणा घडवण्यासाठी वय ही मर्यादा असू शकत नाही. इच्छाशक्ती, सातत्य आणि मेहनत असेल तर आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर नव्याने सुरुवात करता येते.” एका छंदाचे ध्येयात, ध्येयाचे जिद्दीत आणि जिद्दीचे जागतिक यशात रूपांतर करणारा दिलीप घाडगे यांचा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे. कल्याणमधून सुरू झालेली त्यांची धाव आज जागतिक मॅरेथॉनच्या व्यासपीठावर पोहोचली आहे. स्वतःची क्षमता सिद्ध करण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या धावपटूने कल्याण-डोंबिवलीच्या क्रीडा क्षेत्राला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून दिली आहे.























