Home ठळक बातम्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी ठरविल्यास ठाणे जिल्ह्यातील हिंदुत्वाचे विषय एका मिनिटात सुटतील – भाजप...

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी ठरविल्यास ठाणे जिल्ह्यातील हिंदुत्वाचे विषय एका मिनिटात सुटतील – भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण

डोंबिवली | ८ जून :
श्री पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या जागेचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न महायुती सरकारच्या माध्यमातून मार्गी लागला असून ठाणे जिल्ह्यातील हिंदुत्वाशी संबंधित इतर प्रलंबित विषयही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरवले तर एका मिनिटात सुटू शकतात, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. (Hindutva-Related Issues in Thane District Can Be Resolved in a Minute if the Chief Minister and Deputy Chief Minister Decide So: BJP State President MLA Ravindra Chavan)

डोंबिवलीतील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर परिसरात आयोजित कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री उदय सामंत, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी खासदार कपिल पाटील, ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांच्यासह विविध मान्यवर, मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, २७ गाव संघर्ष समितीचे सदस्य आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

पिंपळेश्वर महादेव मंदिरासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाची आठवण करून देताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, या मंदिराच्या जागेसाठी अनेक कार्यकर्ते, भाविक आणि स्थानिक नागरिकांनी सातत्याने लढा दिला. या संपूर्ण प्रक्रियेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयामुळे मंदिराच्या जागेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला. यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाचे आभार मानले पाहिजेत.

यावेळी त्यांनी मंत्री उदय सामंत यांच्या भूमिकेचेही विशेष कौतुक केले. २०२२ मध्ये महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर पिंपळेश्वर मंदिराचा प्रश्न सोडविण्याची विनंती आपण त्यांना केली होती. त्यानंतर त्यांनी दिलेला शब्द पाळत हा विषय मार्गी लावण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

मंदिराच्या जागेच्या संघर्षादरम्यान अनेक अडचणी आणि विरोधाचा सामना करावा लागला. मात्र भाविक, ट्रस्ट सदस्य, स्थानिक नागरिक तसेच विविध शासकीय अधिकारी यांच्या सहकार्यामुळे हा लढा यशस्वी झाल्याचे त्यांनी नमूद केले. पिंपळेश्वर महादेव मंदिर हे भाविकांसाठी विशेष श्रद्धास्थान असून या मंदिराशी असंख्य भक्तांच्या भावना जोडलेल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

“२००१ पासून आजपर्यंत मी डोंबिवलीत असताना एकही सोमवार असा गेला नाही की मी पिंपळेश्वर महादेवाचे दर्शन घेतले नाही. या मंदिराशी माझी आणि हजारो भाविकांची श्रद्धा जोडलेली आहे. त्यामुळे हा निर्णय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे,” असेही त्यांनी सांगितले.

ठाणे जिल्हा हा सुरुवातीपासून हिंदुत्ववादी विचारांचा बालेकिल्ला राहिला असून या जिल्ह्याने नेहमीच महायुतीवर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे पिंपळेश्वर मंदिराप्रमाणेच दत्त मंदिरासह हिंदुत्व आणि श्रद्धेशी निगडित इतर प्रलंबित विषयांनाही सरकारने प्राधान्य देऊन मार्गी लावावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा