मुंबई-नाशिक महामार्गावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी झाली कारवाई
ठाणे | २४ मे :
ठाणे जिल्हा प्रशासनाकडून मुंबई-नाशिक महामार्गावर बेकायदेशीर डिझेल वाहतुकीविरोधात मोठी मोहीम उघडत दोन वेगवेगळ्या धाडसी कारवायांमध्ये तब्बल 87 लाखांहून अधिक किमतीचे ५४ हजार लिटर डिझेल आणि डिझेलसदृश्य द्रवपदार्थ जप्त करण्यात आले आहे. मुंबई – नाशिक महामार्गावर खारेगाव टोलनाका आणि कसारा परिसरात करण्यात आलेल्या या दोन्ही कारवायांमुळे अवैध इंधन माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. (Illegal Diesel Transport Under the Guise of Edible Oil; 54,000 Litres of Diesel Worth Lakhs Seized, Cases Registered Against 10 Accused)
पहिल्या कारवाईत ठाणे शहर गुन्हे शाखा घटक-१ आणि शिधावाटप विभागाच्या संयुक्त पथकाने खारेगाव टोलनाक्याजवळ ‘एडिबल ऑईल’ म्हणजेच खाद्यतेलाच्या नावाखाली बेकायदेशीररीत्या डिझेल सदृश ज्वलनशील पदार्थाची वाहतूक करणारा टँकर (MH-46-BB-7134) जप्त केला. टँकरवर लोकांची दिशाभूल करण्यासाठी ‘Edible Oil’ असे लिहिण्यात आले होते.
२५ हजार लिटर बेकायदेशीर डिझेल सदृश पदार्थ…
संयुक्त तपासणीत या टँकरच्या पाच कप्प्यांमध्ये तब्बल २५ हजार लिटर बेकायदेशीर डिझेल सदृश पदार्थ आढळून आला. या कारवाईत २४.५० लाख रुपये किमतीचे इंधन आणि २२ लाख रुपये किमतीचा टँकर असा एकूण ४६.५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
टँकर मालकासह सात जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा…
प्राथमिक तपासात आरोपींनी विरार खाडी परिसरातून बोटीच्या माध्यमातून डिझेल आणून ते टँकरमध्ये भरल्याचे उघड झाले आहे. हे इंधन नाशिकच्या दिशेने नेण्याचा त्यांचा बेत होता. या प्रकरणी मुख्य आरोपी चालक धर्मेंद्रकुमार श्यामलाल पटेलला अटक करण्यात आली असून टँकर मालकासह आणखी सात जणांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गडचिरोलीच्या खाणीत विक्रीसाठी वाहतूक…
तर दुसऱ्या कारवाईत कसारा पोलीस ठाणे हद्दीत चिंतामणवाडी पोलीस चौकीसमोर ठाणे ग्रामीण पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान आणखी एक संशयास्पद टँकर (MH-46-BU-2388) पोलिसांनी अडवला. चौकशीत चालक आसिफ करीम सय्यदने टँकरमध्ये डिझेल असल्याचे कबूल केले. हे डिझेल गडचिरोली येथील सुरजागड खाणीत विक्रीसाठी नेले जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.
टँकरमध्ये २९ हजार लिटर बेकायदेशीर डिझेल…
या टँकरची तपासणी केली असता त्यामध्ये २९ हजार लिटर बेकायदेशीर डिझेल आढळून आले. पोलिसांनी २६.२६ लाख रुपये किमतीचे डिझेल आणि १५ लाख रुपये किमतीचा टँकर असा एकूण ४१.२६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चालक आणि टँकर मालकाविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सामान्य टँकरमधून ज्वलनशील पदार्थांची वाहतूक…
दोन्ही कारवायांमध्ये एक समान बाब समोर आली ती म्हणजे पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक करण्यासाठी आवश्यक सुरक्षा मानके, परवाने आणि वैध कागदपत्रांचा पूर्ण अभाव. सामान्य टँकरमधून अशा प्रकारे ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करून नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण करण्यात येत होता.
बेकायदेशीर इंधन वाहतूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई…
या मोठ्या कारवायांनंतर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव मस्के-पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जिल्ह्यात डिझेल आणि इतर इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अतिरिक्त इंधन साठा करू नये तसेच बेकायदेशीर इंधन वाहतूक करणाऱ्यांविरोधात प्रशासनाकडून अत्यंत कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

